रेश्मा महेश भांगे (वय 33, सध्या रा. वडारी, ता. पाटोदा) यांचा विवाह 10 जुलै 2015 रोजी बीड येथील महेश निळकंठ भांगे याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नावेळी माहेरकडून 11 लाख रुपये हुंडा आणि 20 तोळे सोन्याचे दागिने देण्यात आले होते. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर सासरच्या लोकांनी विविध कारणांवरून छळ सुरू केल्याचा आरोप रेश्मा यांनी तक्रारीत केला आहे.
advertisement
सासरी राहायला का आला नाहीस? जावयालाच दिला चोप, छ. संभाजीनगरची घटना
तक्रारीनुसार, पतीकडून हाताला चटके देणे, तर सासरच्या इतर सदस्यांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत होती. सासरच्या ‘गुरुकृपा’ नावाच्या हॉटेलमध्ये कुक नसल्याने रेश्मा यांना जबरदस्तीने भांडी घासणे व स्वयंपाक करण्यास लावण्यात आले. याशिवाय, सासरचे लोक बाहेर गेले की त्यांना घरात कुलूप लावून कोंडून ठेवले जात होते. कोणाशीही बोलू न देणे व नातेवाइकांना भेटण्यास मज्जाव केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
अपत्य होऊ नये म्हणून अंधश्रद्धेच्या नावाखाली जेवणातून औषधे देण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. पतीच्या व्यवसायासाठी माहेराहून 25 लाख रुपये आणि बुलेट दुचाकी आणण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीसाठी दीर व नणंदांनीही चिथावणी देत मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर आजारपणात उपचारासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च झाले असून, तो खर्चही पतीने माहेरकडून वसूल केल्याचा आरोप आहे.
सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे रेश्मा गेल्या दोन वर्षांपासून आपल्या तीन वर्षांच्या मुलासह माहेरी राहत आहेत. पतीने खोट्या संशयावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. महिला तक्रार निवारण केंद्रात समझोता न झाल्याने अखेर पाटोदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी महेश भांगे (पती), सासू-सासरे, दीर व दोन नणंदांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.






