पत्नी हरवल्याची तक्रार महागात, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच पतीचं कांड समोर, बीडला काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Beed News: डायल 112 या क्रमांकावर कॉल करून पत्नी हरवल्याची तक्रार देणं बीडच्या एकाला चांगलंच महागात पडलंय.
बीड: महाराष्ट्रात नागरिकांना तात्काळ आपत्कालीन सेवा मिळावी म्हणून ‘डायल 112’ ही सेवा देण्यात आली आहे. 112 क्रमांकावर फोन केल्यास तात्काळ मदत मिळते. परंतु, या क्रमांकावर कॉल करून पत्नी हरवल्याची तक्रार देणं बीडच्या एकाला चांगलंच महागात पडलंय. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील हेळंब गावातील गोविंद भारती यांनी 12 फेब्रुवारी रोजी ‘डायल 112’ वर संपर्क साधून पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. या कॉलची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी तात्काळ संबंधित गावाकडे रवाना झाले. आपत्कालीन सेवेला आलेली माहिती गंभीर असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता चौकशी सुरू केली.
advertisement
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून आली. अधिक विचारपूस केल्यानंतर पत्नी बेपत्ता नसून त्या माहेरी गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ वाया गेल्याचेही समोर आले.
advertisement
यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेत परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. खोटी माहिती देऊन आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सय्यद मजहर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांमुळे खऱ्या आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी आपत्कालीन सेवांचा जबाबदारीने वापर करावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 9:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
पत्नी हरवल्याची तक्रार महागात, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच पतीचं कांड समोर, बीडला काय घडलं?










