मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील गट क्रमांक 127 मधील सुमारे दहा गुंठे क्षेत्रात कांद्याबरोबरच अफूचे पीक घेतले जात होते. संशयित हालचालींबाबत एलसीबीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली. शेतात पोहोचताच अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून पिकाची खातरजमा करून घेतली. तपासणीत संबंधित पीक अफूचेच असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
advertisement
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला!
या कारवाईत एकूण 13 किलो 260 ग्रॅम वजनाची अफूची झाडे हस्तगत करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची बाजारातील अंदाजे किंमत 3 लाख 31 हजार 500 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेकायदेशीररीत्या घेतलेल्या या पिकामुळे अमली पदार्थविरोधी कारवाईला आणखी बळ मिळाले असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बन्सी महादेव घाडगे (रा. सातेफळ, ता. केज) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्न, पोलीस हवालदार दिलीप गित्ते, महेश जोगदंड, दीपक खांडेकर, भागवत शेलार, विकास राठोड, गणेश मराडे तसेच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक मांजरे व डोंगरे यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे कारवाई यशस्वी ठरली.
दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध लागवडीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शेती करावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात बेकायदेशीर शेतीबाबत चर्चा रंगू लागली असून पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.






