कांद्याच्या शेतीत लावलं ‘पैशाचं’ पीक, प्रकरण अंगलट, बीडच्या शेतकऱ्यावर थेट कारवाई
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संबंधित शेतावर छापा टाकला आणि संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला.
बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदेशीर शेतीचा प्रकार उघडकीस आला आहे. युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातेफळ परिसरात कांद्याच्या पिकामध्येच अफूची लागवड केल्याची धक्कादायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संबंधित शेतावर छापा टाकला आणि संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील गट क्रमांक 127 मधील सुमारे दहा गुंठे क्षेत्रात कांद्याबरोबरच अफूचे पीक घेतले जात होते. संशयित हालचालींबाबत एलसीबीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली. शेतात पोहोचताच अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून पिकाची खातरजमा करून घेतली. तपासणीत संबंधित पीक अफूचेच असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
advertisement
या कारवाईत एकूण 13 किलो 260 ग्रॅम वजनाची अफूची झाडे हस्तगत करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची बाजारातील अंदाजे किंमत 3 लाख 31 हजार 500 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेकायदेशीररीत्या घेतलेल्या या पिकामुळे अमली पदार्थविरोधी कारवाईला आणखी बळ मिळाले असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बन्सी महादेव घाडगे (रा. सातेफळ, ता. केज) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
advertisement
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्न, पोलीस हवालदार दिलीप गित्ते, महेश जोगदंड, दीपक खांडेकर, भागवत शेलार, विकास राठोड, गणेश मराडे तसेच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक मांजरे व डोंगरे यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे कारवाई यशस्वी ठरली.
advertisement
दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध लागवडीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शेती करावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात बेकायदेशीर शेतीबाबत चर्चा रंगू लागली असून पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 12:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
कांद्याच्या शेतीत लावलं ‘पैशाचं’ पीक, प्रकरण अंगलट, बीडच्या शेतकऱ्यावर थेट कारवाई






