बीड : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे नक्कीच असतात. मात्र, काही जण त्या संकटांमुळे, त्या परिस्थितीमुळे आहे ते स्विकारुन खचतात. तर काही जण त्या परिस्थितीवर मात करत अत्यंत कठोर परिश्रम करण्याची तयारी दर्शवतात आणि ती परिस्थिती बदलण्याचा निर्धार करुन प्रामाणिकपणे काम करत राहतात आणि एक दिवस त्या परिस्थितीवर मात नक्कीच करतात. मुस्लीम समुदायातून येणाऱ्या उजमा शेख या तरुणीचा प्रवास असाच राहिला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतवर मात करत या तरुणीने पीएसआय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तिच्या या यशानंतर न्यूज18 लोकलने तिच्याशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्या प्रवास उलगडला.
advertisement
4 महिन्यांची असतानाच वडिलांचं निधन -
उजमा हिचा जन्म जन्म 1996 मध्ये झाला. पण ती 4 महिन्यांची असताना तिचे वडील वारले. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर अहमदनगरमधून तिची आई तिला घेऊन आपल्या माहेरी बीड जिल्ह्यातील आष्टी या ठिकाणी आल्या. तिची आई दोन मावशी आणि ती असे सर्वजण सोबत राहू लागले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्याच परिस्थितीत तिच्या आईने तिचे पालनपोषण केले आणि आज हीच उजमा पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर झाली आहे.
उजमा शेख या तरुणीने संयुक्त गट ब पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होत यशाला गवसणी घातली आहे. कोरोनामुळे 2020 ची परीक्षेला उशीर झाला आणि मग नंतर 2021 मध्ये पूर्व आणि 2022 मध्ये मुख्य परीक्षा तिने दिली. यामध्ये ती पास झाल्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये तिने फिजिकल टेस्ट दिली. यामध्ये ती पास झाल्यानंतर मार्च महिन्यात तिची मुलाखत झाली. यानंतर 4 जुलै 2023 रोजी तिचा निकाल आला. मात्र, या निकालात फक्त 1 मार्क कमी असल्याने तिचं नाव प्रतिक्षा यादीत आलं. फक्त एका मार्काने तिचं यश हुकल्याने उजमा फार निराश झाली होती. मात्र, याचवेळी तिला तिच्या कुटुंबीयांनी फार आधार दिला. ही परीक्षा आयुष्यातील शेवटची तर परीक्षा नाही ना, मग पुन्हा देता येईलच, असे म्हणत तिच्या आईने तिचा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे यानंतरही तिने सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी ती प्रतिक्षा यादी 18 मार्च 2024 रोजी जाहीर झाली. यामध्ये उजमा हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. माझ्या या प्रवासात आई, बहीण तिचे पती, आणि आत्याच्या कुटुंबीयांनी पण खूप मोलाचे सहकार्य केले असे ती म्हणाली.
उजमा हिचे शिक्षण –
उजमा हिचे पहिले ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद कन्या प्रशाळा आष्टी येथे झाले. विशेष म्हणजे याच शाळेत तिच्या आई सायरा शेख या शालेय पोषण आहार सेविका म्हणून कार्यरत आहेत. 2012 मध्ये दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिच्या शिक्षणात दोन वर्षांचा गॅप पडला. तिने पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली आणि 2016 मध्ये आष्टी येथील हंबर्डे कॉलेज येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने 2019 मध्ये आष्टी येथील हंबर्डे कॉलेज येथूनच बीसीए या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पोलीस सेवेची आवड –
न्यूज18 लोकल सोबत बोलताना उजमा हिने सांगितले की, माझ्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे माझी ही परिस्थिती बदलावी हे मनापासून वाटत होते. त्यातच मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना मुबारक शेख नावाचे पोलीस अधिकारी आष्टीला सेवेत होते. त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यावेळी माझ्या मनात पोलीस सेवेची आवड निर्माण झाली आणि हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर ती स्पर्धा परीक्षेसाठी वाचनाला सुरुवात केली. यासाठी हंबर्डे कॉलेजमध्ये असलेले प्राध्यापक शिवाजी राख यांनीही मला मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी पुण्यात 1 वर्षे अभ्यास केला. मात्र, कोरोनामुळे मला घरी परतावे लागले.
कोरोनाकाळात तो अनुभव अन् बाथरुमची मदत -
पुण्यातून परत आष्टीमध्ये आल्यावर मी सरस्वती अभ्यासिका ज्वाईन केली. त्याचदरम्यान, मला कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यानंतर तिथल्या मुलांनी तक्रार केल्याने मग अभ्यासिका बंद करावी लागली. घरी आल्यावर टेंशन आलं, घरी वन रुम किचन, त्यात घरात 5 जण राहणारी, त्यामुळे अभ्यासासाठी पोषक असं वातावरण नव्हतं. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, हा सर्व विचार करत असतानाच अंघोळीच्या बाथरुममध्ये लक्ष गेलं आणि विचार आला हे दिवसभर रिकामंच असतं.
त्यामुळे मग मी याच बाथरुममध्ये सर्व व्यवस्था करत याचठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली. याठिकाणी मी प्रिलिअम्सची संपूर्ण तयारी केली. तब्बल 8 महिने मी या बाथरुममध्ये अभ्यास केला. यानंतर पुन्हा पुण्यात गेली आणि त्याठिकाणी मुख्य परिक्षेची तयारी गेली. दरम्यान, रनिंग करताना पायाला दुखापत झाल्याने मला दीड ते दोन महिने मैदानी चाचणीची तयारी होत नव्हती. त्या दरम्यान, लक्ष्य अकॅडमीचे विरेंद्र पडवळ सरांनी माझी तयारी करुन घेतली आणि मैदानी चाचणीत मला 100 पैकी तब्बल 90 गुण मिळाले. त्यानंतर मुलाखतीसाठी निवड झाली. मुलाखतीमध्ये मला 40 पैकी 21 गुण मिळाले. पण 1 गुण कमी मिळाल्याने माझे नाव प्रतिक्षा यादी गेले. यावेळी अत्यंत वाईट वाटलं. इतकी मेहनत केली पण एका मार्काने नाव यादी आलं नाही. त्यामुळे इतकं टेन्शन आलं की, रात्रभर झोपली नाही.
पण यादरम्यान, मी पुण्यातील रयत अॅकडमीचे उमेश कुदळे यांच्याकडे मॉक इंटरव्यू दिले होते. त्यांनी, माझ्या कुटुंबीयांनी आणि माझ्या मित्रपरिवाराने मला या काळात मोठा पाठिंबा दिला. यानंतर मी सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी 18 मार्च 2024 रोजी प्रतिक्षा यादी जाहीर झाली आणि माझी पीएसआयपदी निवड झाली. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. आईच्या कष्टामुळे आणि तिच्या मेहनतीमुळे मला यश मिळालं आणि आता माझ्या या यशामुळे तिच्या मेहनतीला आणि कष्टाला पूर्णविराम मिळेल, अशी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया तिने यावेळी दिली.
समाजातील तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला -
उजमा हिने पालकांना संदेश देताना म्हटले की, मी तयारी करत असताना मला अनेकांनी विरोध केला. पण मी असं म्हणेन की, प्रत्येकांनी आपल्या मुलामुलींना पाठिंबा द्यायला हवा. त्यांना शिकण्याची संधी द्यायला हवी. प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतात आणि त्या कलागुणांना वाव देणं फार महत्त्वाचं आहे, असे ती म्हणाली. तसेच विद्यार्थ्यांना सांगेन की, जोपर्यंत यश मिळत नाही. तोपर्यंत थांबू नका. खचू नका. अडचणींवर मात करायला हवी. जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करू तेव्हा आपण शेवटपर्यंत म्हणजे यशापर्यंत नक्कीच पोहोचू. वेळ निघून गेल्यावर परत येत नाही. त्यामुळे वेळेचे सदुपयोग करायला हवा, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला.
मुस्लीम समुदायातील येत असलेल्या उजमा शेख या तरुणीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पोलीस उपनिरीक्षक होत हे यश मिळवले. तिचा हा प्रवास समाजातील प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.