mpsc success story : पतीनं दिली खंबीर साथ, अन् मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या महिलेची MPSC मध्ये क्लास 1 पदाला गवसणी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
11 वी आणि 12 वीचे शिक्षण त्यांनी पाचोरा येथीलच एस.एस.एम.एम. कॉलेज येथून पूर्ण केले. या 11 वी आणि 12 वीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी त्यांचे मूळ गाव अंतुर्ली ते पाचोरा असा सायकलवर प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले.
खुशालकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव : अनेकांना वाटते की, लग्नानंतर आपले करिअर संपते. लग्नानंतर महिलांची स्वप्न अपूर्ण राहतात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील विद्या पाटील यांनी लग्नानंतर अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील प्रत्येकाला प्रेरणादायी ठरावा, असा आहे. नुकताच एम.पी.एस.सी. राज्यसेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत विद्या पाटील यांनी यश मिळवत नगरपालिका मुख्याधिकारी (क्लास 1 पोस्ट) या पदाला गवसणी घातली आहे.
advertisement
विद्या पाटील या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक या गावाच्या कन्या आहेत. सध्या त्या नाशिक येथे वस्तू व सेवाकर कार्यालयात राज्यकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. यानंतर त्यांनी आता नुकत्याच एमपीएसी परीक्षेचा लागलेल्या निकालात नगरपालिका मुख्याधिकारी (क्लास 1 पोस्ट) या पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशानंतर न्यूज18 लोकलने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. जाणून घेऊयात त्यांचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास.
advertisement
सायकलने केला प्रवास -
विद्या पाटील या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली बुद्रूक या गावातील रहिवासी आहे. त्यांचे वडील राजेंद्र पाटील हे शेतकरी आहेत. तर आई प्रतिभा पाटील या गृहिणी आहेत. विद्या पाटील यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुर्ली येथे झाले. त्यानंतर सहावी ते दहावीचे शिक्षण त्यांनी पी. के. शिंदे हायस्कूल पाचोरा येथून पूर्ण केले. यानंतर 11 वी आणि 12 वीचे शिक्षण त्यांनी पाचोरा येथीलच एस.एस.एम.एम. कॉलेज येथून पूर्ण केले. दहावीला असताना वडिलांनी मला वचन दिलं होतं की, जर 75 टक्के गुण मिळाले तर तुला नवीन सायकल घेऊन देईल. त्यामुळे मी त्यांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं. यानंतर त्यांनी त्यांचं वचन पूर्ण करत मला सायकल घेऊन दिली. यानंतर 11 वी आणि 12 वीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी त्यांचे मूळ गाव अंतुर्ली ते पाचोरा असा सायकलवर प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
Sanket Gawhale : विदर्भाचा लाल पुन्हा जाणार रशियात, महिन्याभरात दुसऱ्यांदा आलं निमंत्रण
तसेच विद्या पाटील यांनी बारावीनंतर अध्यापिका विद्यालय जळगाव येथून 2011 या वर्षी डीएडचे शिक्षण पूर्ण केले. डीएड झाल्यानंतर गावात शिकवणीही घेतल्या. यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि इतिहासात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर 2013 साली त्यांचा विवाह पिलखोड येथील पुरुषोत्तम शिरसाठ यांच्याशी झाला. ज्यांची पी. एस.आय.म्हणून निवड झालेली होती.
advertisement

विद्या पाटील आणि त्यांचे पती पुरुषोत्तम शिरसाठ
लग्नानंतर मिळवल्या 4 सरकारी नोकऱ्या -
अनेक जण लग्नानंतर कुटुंब आणि संसारात व्यस्त होतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही करिअर करता येत नाही. पण विद्या पाटील यांनी त्यांच्या कुटुंबातून पाठिंबा मिळाला. त्यांचे आई वडील, त्यांचे पती आणि सासू-सासरे या सर्वांचा त्यांना पाठिंबा मिळाला. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. लग्न झालं त्याच वर्षी 2013 मध्ये पी. एस.आय. पदासाठीची पूर्व परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. 21 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची फिजिकल टेस्ट होती. मात्र, त्याच दिवशी त्यांना मुलगी झाली. त्यामुळे त्यांना पी.एस.आय. साठी फिजिकल टेस्ट देता आली नाही. पण या काळात त्यांना त्याचे पती यांनी साथ दिली आणि निराश न होता, पुन्हा तयारी करण्यासाठी प्रेरित केले. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना पूर्णवेळ देता येत नव्हता. मात्र, मनात कुठेतरी खंत होती. मग 2021 या वर्षी त्यांनी खऱ्या अर्थाने तयारीला सुरुवात केली. त्यांनी सर्व परिस्थितीवर मात करून, कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर अभ्यास सुरू ठेवला आणि मागील दोन वर्षात त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल चार सरकारी नोकऱ्यांना गवसणी घातली.
advertisement
विद्या पाटील यांनी मिळवलेले यश -
- राज्यकर निरीक्षक, (एस.टी.आय.) - 2020
- सहायक कक्ष अधिकारी (ए.एस.ओ.) - 2020
- राज्यकर निरीक्षक, (एस.टी.आय.) - 2021
- राज्यसेवा परीक्षा 2022 निवड - मुख्याधिकारी (वर्ग -1)
आता झाल्या क्लास 1 अधिकारी -
विद्या पाटील यांनी एम.पी.एस.सी राज्यसेवा परीक्षा- 2022 यासाठी 2022 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी मुलाखतही झाली. यानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या गुणवत्ता यादीत त्यांचे नाव आले. बुधवारी 20 मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात त्यांची नगरपालिका मुख्याधिकारी (क्लास 1 पोस्ट) या पदी निवड झाली.
advertisement
कोणत्याही क्लासविना केली तयारी -
न्यूज18 लोकल सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोणताही क्लास न लावता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांनी मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमात स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहिले. सेल्फ स्टडीवर भर देत जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत अभ्यास करत त्यांनी पूर्णवेळ तयारी केली आणि आज हे यश मिळवले. त्यांचे पती पुरुषोत्तम शिरसाठ हे महाराष्ट्र पोलीस सेवेत असून सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील तरुण, तरुणी, पालकांना दिला हा मोलाचा संदेश -
माझा निकाल लागल्यानंतर माझी गावात विजयी मिरवणूक निघाली. माझा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याठिकाणी अनेक महिला आल्या, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, जर आम्ही केलं असतं तर आपल्यालाही हे यश मिळालं असतं. म्हणून आयुष्यात एक पाऊल टाकणे खुप महत्त्वाचे असते. आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची असेल तर स्वत:वर विश्वास ठेवत काम करा. शेवटी यश अपयश मिळतेच. पण पूर्ण प्रयत्न करुनही जर तुम्हाला अपयश मिळत असेल तर ते काही यशापेक्षा कमी नाही आणि यश मिळेल हे तर हमखास आपलेच असते. आपल्या प्रवासात अनेक लोकांचे योगदान असते. महिलांना आयुष्यात काही करायचे असेल तर त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरुवात करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी न्यूज18 लोकलसोबत बोलताना सांगितले.
भविष्यातील प्लान -
मला अनेक महिलांचे फोन कॉल्स येत आहेत. अनेक महिला माझ्याशी संपर्क साधत आहे. आम्हालाही या परिक्षेची तयारी करायची आहे, आम्हाला मार्गदर्शन करा, असे सांगत आहेत. या सर्वांना भविष्यात मी मार्गदर्शन करेन, तसेच एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
March 25, 2024 9:28 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
mpsc success story : पतीनं दिली खंबीर साथ, अन् मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या महिलेची MPSC मध्ये क्लास 1 पदाला गवसणी!