अलिबागमधील आरसीएफ कॉलनीतील सभागृहात सोमवारी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाचे दोन्ही दावेदार असणारे भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांनी हजेरी लावली.
दोघांच्या एकत्र येण्यावर राजकीय चर्चा नको
याबाबत मंत्री भरत गोगावले यांना विचारले असता आम्ही चांगल्या कामासाठी दोघे एकत्र आलोय. आमच्या एकत्र येण्याची राजकीय चर्चा करू नका. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, असे गोगावले म्हणाले.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीला सोबत लढणार नाही असे म्हणणाऱ्या शिवसैनिकांच्या आग्रहावरही मंत्री भरत गोगावले यांनी वेळ मारून नेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. निवडणुका लागतील तेव्हा बघू असे म्हणत एकत्र लढण्यावर त्यांनी उत्तर दिले. आज आम्ही दोघे एकत्र असलो तरी हा विषय राजकारणाचा नाही, यामध्ये कोणी राजकीय विषय आणू नयेत, असे गोगावले म्हणाले.
जिल्ह्याचा विषय येईल त्यावेळी दोघेही एकत्र येऊ- आदिती तटकरे
गोगावले यांच्याबरोबर एकाच मंचावर आल्याच्या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या, "आम्ही काही पहिल्यांदाच एकत्र आलो नाही. याआधीही दोन तीन वेळा जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र आलो आहे. पालकमंत्रिपदाचा विषय महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित बसून सोडवतील. मात्र जिल्ह्याचा प्रश्न येईल तिथे आम्ही सगळे मतभेद विसरून तेवढ्याच ताकदीने एकत्र येऊ"
महायुतीत पालकमंत्रिपदावरून संघर्ष
महायुती सरकारमध्ये एकत्र असूनही पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षांत सुप्त संघर्ष सुरू आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आमनेसामने आहेत तर रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.