चिपळूण तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटामध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र उभे राहिले आहे. गुहागर मतदारसंघातील धामणदेवी गटातील आंजणी ढाकरवाडी परिसरातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.
advertisement
या प्रवेशामुळे शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उमेदवाराच्याही नावाची घोषणा..
या पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रभाकर गोपाळ मनवळ यांच्या कन्या डॉ. प्रीती प्रभाकर मनोहर यांना धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून सर्वानुमते घोषित करण्यात आले. स्थानिक स्तरावर मनोहर यांचे कार्य आणि जनसंपर्क लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर शिंदे गटात काम केले होते. तालुकाप्रमुख अंकुश काते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख नंदू कांबळे आणि शाखाप्रमुख सुनील घाणेकर यांच्या प्रयत्नातून हा मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गावाच्या विकासासाठी आणि शिवसेनेच्या मूळ विचारांसाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
धामणदेवी गटातील या फूटीनंतर चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीवर याचा थेट परिणाम होणार असून, आगामी राजकीय समीकरणे अधिक रोचक बनली आहेत
