भाऊसाहेब रंगारी गणपती हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं मंडळ आहे. पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून या मंडळाची ओळख आहे. यंदाच्या सजावटीत या मंडळाने शिल्पकला, रंगसंगती, प्रकाशयोजना आणि वास्तुकलेचा अप्रतिम संगम साधला आहे. पंचरत्न महल ही संकल्पना रचताना, भारतीय परंपरेतील महालांची भव्यता व शाही थाट यांचा या कलाकृतीत सुंदर मेळ साधण्यात आला आहे.
advertisement
महलाच्या भिंतींवर सूक्ष्म कोरीव काम, आकर्षक झुंबर, सुशोभित कमानी आणि शाही दरबाराचा अनुभव देणारे दृश्य उभी करण्यात आली आहेत. रंगीबेरंगी प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण महल रात्रीच्या वेळेस अधिकच देखणा आणि दिमाखदार भासत आहे. यामध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून मंडळाने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या महालात प्रवेश करताना भाविकांना एका वेगळ्याच दैवी वातावरणा अनुभव मिळतो. गजाननाची आरास, सजावट आणि पार्श्वभूमीवर वाजणारे भजन-कीर्तन यामुळे भक्तांना पारंपरिक दरबारात असल्याचा अनुभव मिळतो.
दरवर्षी आपल्या वैविध्यपूर्ण संकल्पना आणि कलात्मक सजावटीमुळे भाऊसाहेब रंगारी मंडळाचे गणपती विशेष चर्चेत असतात. यंदाचा 'पंचरत्न महल' देखील पुणेकरांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे.