मुंबईकरांचा वेळ वाचणार, इथं होतोय वांद्रे-वरळी सी लिंकसारखा ब्रिज, डेडलाईन ठरली!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून दक्षिण मुंबईची नवी ओळख ठरेल. पूल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण परिसर सिग्नलमुक्त होणार आहे.
मुंबई: दक्षिण मुंबईतील सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जेजे उड्डाणपूल आणि भायखळा येथील वाय ब्रिज यांना जोडणाऱ्या 892 मीटर लांबीच्या भव्य केबल-स्टेड पुलाचे काम सध्या प्रगतिपथावर असून हा पूल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण परिसर सिग्नलमुक्त होणार आहे. वांद्रे–वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारण्यात येणारा हा आधुनिक पूल दक्षिण मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार आहे.
सध्या जेजे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर भायखळा, दादर किंवा माटुंग्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोहम्मद अली रोड आणि आसपासच्या परिसरात तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा नवीन चारपदरी पूल सुरू झाल्यानंतर प्रवास पूर्णपणे सिग्नल फ्री होईल. त्यामुळे वाहनचालकांचा किमान 15 ते 20 मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचणार असून इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
advertisement
कामाचा वेग काही नागरिकांना संथ वाटत असला तरी या प्रकल्पामागील तांत्रिक आव्हाने मोठी आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात जमिनीखाली 100 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पाणीवाहिन्या आणि गॅस पाइपलाईन आहेत. त्यांना कोणतीही इजा न होता पायाभरणी करणे अत्यंत जिकिरीचे काम आहे. शिवाय हा भाग दाट वस्तीचा असल्याने अवजड यंत्रसामग्रीचा वापर केवळ रात्रीच्या वेळेतच केला जात आहे.
advertisement
या प्रकल्पात रेल्वे हद्दीतील काम आणि इतर पुलांना जोडण्याचे तांत्रिकदृष्ट्या अवघड टप्पे असल्याने एमएमआरडीएची मदत घेण्यात आली आहे. एमएमआरडीएने यातील सुमारे 50 टक्के काम पूर्ण केले असून केबल-स्टेड संरचनेचे मुख्य काम त्यांच्याकडून सुरू आहे. उर्वरित भायखळा फायर ब्रिगेड ते डीजे उड्डाणपुलादरम्यानचे काम महापालिकेमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे.
advertisement
पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून दक्षिण मुंबईची नवी ओळख ठरेल. सध्या काम नियोजित आराखड्यानुसार सुरू असून 2026 च्या मध्यापर्यंत पुलाचे मुख्य खांब उभे राहिले तर निर्धारित वेळेत म्हणजेच 36 महिन्यांच्या कालावधीत हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांचा वेळ वाचणार, इथं होतोय वांद्रे-वरळी सी लिंकसारखा ब्रिज, डेडलाईन ठरली!








