मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने चंगच बांधला आहे. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून नवीन डावपेच टाकत विरोधकांना खिंडीत गाठण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात येत आहे. अशातच भाजपने घेतलेल्या एका निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार निवडीत मोठा बदल केला. मागील २०१७ मध्ये निवडून आलेल्या सुमारे ४० टक्के नगरसेवकांना यावेळी तिकीट नाकारले आहे. काही प्रभाग आरक्षित झाल्यामुळे संबंधित नगरसेवकांना संधी मिळू शकली नाही, तर काही ठिकाणी इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यासाठी आणि पक्षातील तरुण नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
२०१७ च्या बीएमसी निवडणुकीत भाजपने ८२ जागांवर विजय मिळवला होता. यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ९० जागा सोडत, भाजपने १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी १३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
आमदार पत्नी आणि मुलाला तिकीट नाकारलं...
तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी नगरसेवकांमध्ये पश्चिम उपनगरातील संख्या लक्षणीय आहे. या यादीत एका आमदाराच्या पत्नीचा तसेच दुसऱ्या आमदाराच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. एका बाजूला घराणेशाहीवर आक्रमक भाष्य करताना दुसरीकडे भाजप आमदार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात तीन उमेदवारी देण्यात आल्या. यावरून भाजपात चर्चांना उधाण आले आहे.
मतदानाआधीच दोन जागांवर फटका..
भाजपला मतदानापूर्वीच दोन जागांवर फटका बसला आहे. वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ मध्ये महायुतीचा उमेदवार नाही. वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजप उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. तर, २१२ मध्ये भाजपच्या महिला उमेदवाराला अर्ज दाखल करण्यास १५ मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे एबी फॉर्म असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या वॉर्डमध्ये अपक्ष अथवा अन्य उमेदवाराला भाजपला पाठिंबा द्यावा लागणार आहे.
