शिंदे गटाचे खाते उघडले, चार जागांवर विजय
दरम्यान, शिवसेना शिंदे गटानेही महापालिका निवडणुकीत दमदार सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १६ मधून राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले आणि ज्योती जोंधळे यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे खाते चार जागांवर उघडले आहे. या यशामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, पुढील जागांबाबत आशा वाढल्या आहेत.
advertisement
पावणेचार वर्षांची प्रतीक्षा संपली
तब्बल पावणेचार वर्षांपासून रखडलेली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. गुरुवारी (दि. १५ जानेवारी) शहरात मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे १२२ पैकी १५ प्रभागांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
१२२ जागांसाठी ७३५ उमेदवार मैदानात
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण ७३५ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. भाजपकडून सर्वाधिक ३८ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले होते. त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाकडून ३० माजी नगरसेवक मैदानात होते. एकूण ८७ माजी नगरसेवक पुन्हा एकदा मतदारांसमोर गेले असून, त्यापैकी सहा माजी नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते.
भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट लढत
या निवडणुकीत १२२ पैकी तब्बल ९६ जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये थेट सामना रंगला. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तर शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन सेना यांच्यासोबत युती केली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपली ताकद पणाला लावली. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासह तब्बल २०८ अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात होते.
