मुंबई: विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. मात्र, महायुतीचे नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सगळं काही आलबेल असल्याचे सांगतात. मात्र, या तिन्ही पक्षांमधील दुसऱ्या आणि तिसर्या फळीतील नेत्याकडून कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येते. भाजपच्या नेत्याने आता थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका ट्वीटमुळे या चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
मुंबईत काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने मोठा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून सूत्र हलवत आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याचे म्हटले जाते. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले जात आहे. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “महाराष्ट्रात फक्त देवाचा न्याय चालेल, नो भाईगिरी अँड नो दादागिरी!” असे त्यांनी लिहिले असून, या विधानामध्ये त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले तरी राजकीय उपरोध स्पष्ट दिसतो.
भाजप कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘देवाभाऊ’ म्हणून संबोधले जाते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भाई’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘दादा’ अशी ओळख आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वशैलीवरच निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सहा दिवस आमरण उपोषण केल्याने राज्य सरकारला मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले. या काळात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कायद्याच्या चौकटीत राहून उपाययोजना करत जरांगेंना खूष करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस जरांगे यांनी सरसकट आरक्षणाचा हट्ट सोडून हैदराबाद गॅझेटिअरनुसार आरक्षण मान्य केले. या प्रकरणानंतर महायुतीत ‘श्रेयाची लढाई’ पेटली आहे. भाजप कार्यकर्ते फडणवीसांच्या पुढाकारामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाल्याचा प्रचार करत आहेत. तर शिंदे आणि पवार यांचे कार्यकर्ते बचावात्मक भूमिकेत गेलेले दिसतात.