कोपरखैरणे आणि वाशी पोलीस ठाण्यात भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बॉबी शेख आणि त्यांचा मुलगा यश बॉबी शेख यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला “कपडे काढून तुझी धिंड काढेल” अशी धमकी देत तिच्या मित्रांना मारहाण केल्याचा आरोप यश शेखवर आहे.
वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान संतापजनक घटना
पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वाशी येथे मित्रमंडळी जमली असताना हा प्रकार घडला. आरोपी यश शेख सतत मुलीच्या मागे लागल्याने मुलीने त्याला नकार दिला. यामुळे चिडलेल्या यशने मुलीच्या मित्रांनाही धमकी देत तिला माझ्यासोबत राहण्यास सांगितले. ती जर माझ्यासोबत राहिली नाहीतर कपडे काढून धिंड काढेल अशी धमकी दिली होती.
advertisement
या धमकीनंतर मुलीच्या मित्रांनी यशला स्पष्ट सांगितले की ती त्याच्यासोबत राहण्यास इच्छुक नाही. यावर संतापून यश शेखने आपल्या मित्रांना बोलावून घेतले आणि पीडित मुलीच्या मित्रांना मारहाण केली.
POCSO अंतर्गत गुन्हा, आरोपी फरार
घटनेनंतर पीडित मुलीने धक्कादायक धमक्या व वर्तनाबद्दल वाशी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार यश बॉबी शेखवर POCSO कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वडिलांचाही दबाव; दुसरा गुन्हा दाखल
आरोपीचे वडील बॉबी शेख यांनीही पीडित मुलीच्या मित्रांच्या पालकांना फोन करून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचे समोर आले. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी त्यांच्यावर दमदाटीचा गुन्हा नोंदवला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर POCSO सारख्या गंभीर गुन्ह्यात नोंद झाल्याने नवी मुंबईत राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांची तपासणी सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
