मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकटेंना मोठा झटका दिला होता. त्यांचा सख्खा भाऊ आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते भारत कोकाटे यांचा भाजपात पक्षप्रवेश करण्यात आला होता. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.
advertisement
यानंतर आता भाजपने दुसरा मोहरा गळाला लावला आहे. शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. सिन्नर येथे ३ नोव्हेंबरला हा पक्षप्रवेश होणार आहे. सांगळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री माणिकराव कोकटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी १ लाखापर्यंत मतं घेतली होती.
अशा महत्त्वाचा नेता भाजपने आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजपकडून अजित पवारांची कोंडी केली जात असल्याची चर्चा आहे. दोन बडे नेते भाजपच्या गळाला लागल्याने सिन्नरसह नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार आहेत.
मराठा-ओबीसी समीकरण साधलं
विशेष म्हणजे भाजपने माणिकराव कोकाटेंना गळाला लावत एक मराठा चेहरा आपल्या पक्षात घेतला आहे. तर उदय सांगळेंना सोबत घेत ओबीसी समीकरण पक्कं करण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून होताना दिसत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपने अजित पवारांचा नाशिकमध्ये डबल गेम केल्याचं बोललं जात आहे.
