दुबार मतदार, बोटावरची शाई पुसणे, मतदान यंत्रातील घोळ आदी मुद्द्यांवरून मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीदरम्यान तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला सवाल केले. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली.
ज्यांनी बोटावरची शाई पुसली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
advertisement
आशिष शेलार म्हणाले, निवडणुकीच्या दिवशीच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांना त्यांचा राजकीय हेतू साध्य करायचा आहे का? उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक आडमुटेपणा करीत आहेत. बोटावरची शाई पुसल्याच्या तक्रारी अनेक जण करीत आहेत. माध्यम प्रतिनिधींनी देखील काही प्रयोग केले. त्यांना शोधपत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला. परंतु मतदारांना शाई पुसाविशी का वाटली? या कृतीमधून त्यांना काय सांगायचे होते? त्यांना पुन्हा मतदान करायचे होते का? याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ठाकरे बंधूंच्या बोटावरील शाई पुसली का?
बोटावरची शाई पुसणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, शाई पुसणारे लोक पुन्हा मतदान करू पाहत होते. ज्यांनी आक्षेप घेतले, त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? ज्यांची शाई पुसली गेली, त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली का? ठाकरे बंधूंच्या बोटावरची शाई पुसली गेलीये का? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही आशिष शेलार म्हणाले.
सल्लागार सडके-ठाकरे बंधू रडके
ठाकरेंचे सल्लागार सडके आहेत आणि ठाकरे बंधू रडके आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच जर त्यांना रडायचेच आहे तर ते लढतात कशाला? ठाकरे बंधू राजकीय नटसम्राट आहेत, रडके आहेत, त्यांच्यासोबत मुंबईकर जाणार नाहीत, मुंबईकर लढणाऱ्यांसोबत राहतील, असे शेलार म्हणाले.
