तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर ‘सूचना व अद्यतने’ या टॅब अंतर्गत ‘निवडणूक प्रभागांच्या मतदार यादीत आपले नाव शोधा’ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर जाऊन मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. तसेच, मतदारांच्या सोईसाठी महानगरपालिका मुख्यालय तसेच २४ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमध्ये मतदार सहायता केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात येत आहेत.
advertisement
दरम्यान, संभाव्य दुबार मतदारांबाबतही प्रत्येक सहायता केंद्रात माहिती देण्यात येईल. तसेच, दुबार मतदारांशी निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून संवाद साधला जाईल. तथापि, मतदार केंद्रनिहाय यादी तयार होईपर्यंत दुबार मतदारांबाबतची विहित प्रक्रिया केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात येत आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केले आहे की, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर जर त्यात काही लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकुन अंतर्भूत झाले आणि दिनांक १ जुलै २०२५ च्या विधानसभा मतदार यादीत नावे असूनही संबंधित प्रभागात नाव समाविष्ट झाली नाहीत, अशा बाबी स्वत:हून अथवा अन्य मार्गाने निदर्शनास आणण्यात आल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन अंतिम मतदार यादी तयार करताना त्या चुकांची दुरुस्ती करावी. संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत किंवा कसे याची तपासणी करावी. जर, मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असतील तर त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करावेत आणि अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे या निर्देशांमध्ये नमूद केले आहे. यानुसार, महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे.
