२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, १३ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. त्यापैकी ठाकरे गटाने सात जागा जिंकल्या, तर शिंदे यांच्या पक्षाने सहा जागा जिंकल्या. मुंबईत, ठाकरे गटाने लढवलेल्या चारपैकी तीन जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने तीनपैकी एक जागा जिंकली. ही जागाही ४८ मतांच्या मताधिक्याने जिंकली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने आपली ताकद दाखवली असली तरी ठाकरे गट वरचढ ठरला.
advertisement
मुंबईतील ठाकरेंची साथ सोडून जवळपास ४० नगरसेवकांनी शिंदेंना साथ दिली. त्यातील बहुतांशी जणांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. भाजपने शिवसेना शिंदे गटाला ९० जागा सोडल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या यशापयशावर महायुतीच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
ठाकरेंच्या उमेदवाराचा गेम की स्वत: चक्रव्यूहात अडकणार?
मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मराठी मते ठाकरेंसोबत असल्याचे दिसून आले. आता, वर्षभरानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तर, भाजप-शिंदे गटाने शड्डू ठोकला आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत ही मराठीबहुल भागात होणार आहे. यातील काही जागा हायव्होल्टेज निवडणूक असणार आहेत.
शिवडी, वरळी, दादर-माहिम, वडाळा, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम), मागाठाणे, दिंडोशी, दहिसर, वांद्रे (पूर्व) आणि कलिना आदी ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यात प्रमुख लढती रंगणार आहेत. हा भाग ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. हा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवले. भाजपनेही खिंडार पाडले. मात्र, स्थानिक पातळीवर ठाकरेंसोबत शिवसैनिक राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराचा गेम होणार की चक्रव्यूहात शिंदेच अडकणार हे निकालात स्पष्ट होईल.
> मुंबईतील काही महत्त्वाच्या लढती:
वॉर्ड ८९ (विलेपार्ले) : गीतेश राऊत (ठाकरे गट) विरुद्ध राजेश नाईक (शिंदे गट)
वॉर्ड १९१ (दादर) : माजी महापौर विशाखा राऊत (ठाकरे गट) विरुद्ध प्रिया सदा सरवणकर (शिंदे गट)
वॉर्ड १९९ (वरळी): माजी महापौर किशोरी पेडणेकर (ठाकरे गट) विरुद्ध रूपाली कुसळे (शिंदे गट)
वॉर्ड १९४ (प्रभादेवी) : निशिकांत शिंदे (ठाकरे गट) विरुद्ध समाधान सदा सरवणकर (शिंदे गट)
वॉर्ड ११४ (विक्रोळी): राजुल संजय पाटील (ठाकरे गट) आणि सुप्रिया घरत (शिंदे गट)
वॉर्ड १६३ (चांदिवली): शैला दिलीप लांडे (शिंदे गट) विरुद्ध संगीता सावंत (ठाकरे गट)
वॉर्ड १९२ (दादर) : प्रीती पाटणकर (शिंदे गट) विरुद्ध यशवंत किल्लेदार (मनसे)
वॉर्ड १९८ (लोअर परेल-वरळी) अबोली खाड्ये (ठाकरे गट) विरुद्ध वंदनी गवळी (शिंदे गट)
वॉर्ड २०३ (लालबाग) अनिल कोकळ विरुद्ध किरण तावडे ठाकरे गट
वॉर्ड २०६ (शिवडी) नाना आंबोले विरुद्ध सचिन पडवळ ठाकरे गट
