पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात ही घटना घडली. रोही पिंपळगाव येथील 40 वर्षीय शेतकरी बाबासाहेब शिंदे आणि त्यांची 35 वर्षीय पत्नी रुक्मिणीबाई शिंदे अशी मृत शेतकरी दाम्पत्याची नावं आहे.
आज शनिवारी नेहमीप्रमानए बाबासाहेब आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई शिंदे हे दोघे शेतात कामासाठी गेले होते. पण दुपारची जेवणाची वेळ झाली तरी दोघेही घराकडे परतले नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता दोघांचे मृतदेह आढळून आले. बाबासाहेब शिंदेंचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. तर रुक्मिणीबाई यांचा मृतदेह खाली पडलेला होता.
advertisement
या घटनेमुळे शिवारात एकच खळबळ उडाली. शेजारी आणि नातेवाईकांनी शेतात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असले शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बाबासाहेब शिंदे यांनी हे कृत्य का केलं, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पत्नीचा मृत्यू नेमका कश्यामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.