अहिल्यानगर : अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश कोपरगाव पोलिसांनी केला आहे. या टोळीने कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका तरुणाची तब्बल सव्वा दोन लाख रुपयांनी फसवणूक केली. बनावट नवरी म्हणून लग्न करणाऱ्या महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, माहेगाव येथील एका तरुणाचा विवाह ठरवून देण्याचं आश्वासन देत या टोळीने त्याच्याकडून दोन लाख 25 हजार रुपये घेतले. 12 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील रोशनी अशोक पवार हिच्याशी या तरुणाचं लग्न पार पडले. सर्व विधीवत सोहळा पार पडल्यानंतर नवरी माहेगाव येथे पतीच्या घरी आली. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटे ती घरातून पसार झाली.
विवाहाचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले
सकाळी नवरी गायब असल्याचं लक्षात आल्यानंतर वराच्या कुटुंबाने तिच्या ओळखीबाबत चौकशी केली असता, संपर्कासाठी दिलेले सर्व मोबाईल नंबर बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर संशय निर्माण झाल्याने संबंधित तरुणाने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु करताच ही टोळी अविवाहित तरुणांना बनावट विवाहाचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचं समोर आलं.
आरोपी महिलेला शिताफीने अटक
या प्रकरणात बनावट नवरी रोशनी अशोक पवारसह एकूण पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेला शिताफीने अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या या नव्या फसवणूक रॅकेटचा तपास पोलीस जोरात करत आहेत.