वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?
भारतीय कायद्यानुसार, मालमत्ता दोन प्रकारांची असते. ते खालील प्रमाणे आहेत.
स्व-अर्जित मालमत्ता: जी व्यक्तीने स्वतःच्या नावाने खरेदी केली असते किंवा भेट, देणगी किंवा वसीयत स्वरूपात मिळवली असते.
वडिलोपार्जित मालमत्ता : जी मालमत्ता चार पिढ्यांपासून अखंडपणे वारशाने मिळत आलेली असते. म्हणजेच पणजोबा, आजोबा, वडील आणि सध्याची पिढी. ही मालमत्ता एखाद्या एकाच व्यक्तीच्या मालकीची मानली जात नाही, तर सर्व पिढ्यांचे समान हक्क त्यावर असतात.
advertisement
वडिलोपार्जित मालमत्तेचे कायदे स्व-अर्जित मालमत्तेपेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहेत. कारण, ती कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर असली तरी ती कुटुंबातील सर्व सदस्यांची संयुक्त मालकी मानली जाते.
वडिलोपार्जित मालमत्ता कोण विकू शकतो?
या मालमत्तेवर चार पिढ्यांना कायदेशीर हक्क असतो. त्यामुळे, वडिलोपार्जित मालमत्ता विकायची असल्यास सर्व भागधारकांची (heirs) संमती आवश्यक असते. यामध्ये मुलींचाही समावेश होतो. केवळ वडील किंवा कुटुंबातील प्रमुखाने स्वतःच्या इच्छेनुसार ही मालमत्ता विकण्याचा निर्णय घेता येत नाही.
जर सर्व वारसदारांनी विक्रीस मान्यता दिली तरच मालमत्तेची विक्री वैध ठरते. त्यासाठी सर्वांच्या संमतीची लेखी नोंद ठेवणे व नंतर नोंदणी कार्यालयात विधीमान्य प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते.
संमतीशिवाय विक्री केल्यास काय होते?
जर वडिलोपार्जित मालमत्ता कोणत्याही एका व्यक्तीने इतर वारसदारांच्या संमतीशिवाय विकली, तर ती विक्री कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरू शकते. अशा प्रकरणात इतर भागधारकांना कोर्टात जाण्याचा व विक्रीविरुद्ध दावा दाखल करण्याचा अधिकार असतो. ते संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवू शकतात आणि मालमत्तेवरील व्यवहारावर स्थगिती (Stay Order) मिळवू शकतात. काही प्रकरणांमध्ये न्यायालय विक्री रद्द करण्याचाही आदेश देऊ शकते.
तज्ञांचा सल्ला काय?
कायदेशीर तज्ज्ञ सांगतात की, वडिलोपार्जित मालमत्ता विकण्यापूर्वी सर्व वारसदारांचे हक्क स्पष्टपणे निश्चित करावेत. सर्वांची संमती मिळवूनच व्यवहार करावा, अन्यथा पुढे मोठा वाद उद्भवू शकतो. तसेच व्यवहार करताना नोंदणी दस्तऐवजात प्रत्येक भागधारकाचा सही व ओळख पुरावा जोडावा.
