मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांसाठी त्यांच्या सोयीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे सेवा पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये, मुंबई, लखनऊ, हजरत निजामुद्दीन (दिल्ली), पुणे, बंगळुरू, नागपूर, हैदराबाद या ठिकाणाचा समावेश आहे. या स्थानकांवर रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये प्रथम वातानुकूलित, वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्बा अशा सर्व वर्गांचा समावेश आहे. प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष मागणीवर आधारित 14 रेल्वे गाड्यांचे नियोजन करून त्यांची घोषणा केली आहे.
advertisement
मुंबई सीएसएमटी ते नागपूर विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी 03:30 वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी एलटीटी येथून सकाळी 11:10 वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस ते हैदराबाद विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी एलटीटी येथून सायंकाळी 05:20 वाजता सुटेल. पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी 7 डिसेंबर रोजी पुणे येथून रात्री 08: 20 वाजता सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार मध्य रेल्वेकडून आणखी विशेष गाड्यांचे नियोजन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
