Pune Train: पुणेकरांसाठी 'महत्त्वाची सूचना'! दौंड-मनमाड दरम्यान रेल्वेचा पॉवरब्लॉक; 30 हून अधिक गाड्या रद्द
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-लॉकिंग कामासाठी पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे पुणे विभागातून धावणाऱ्या ३० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
पुणे : पुणे विभागातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षात मोठे बदल आणि गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. दौंड-मनमाड विभागातील दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ४ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत पॉवरब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-लॉकिंग कामासाठी पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे पुणे विभागातून धावणाऱ्या ३० हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे किंवा त्यांना उशीर होणार आहे.
सोलापूर आणि विदर्भात जाणाऱ्या गाड्यांना फटका
या ब्लॉकेजचा थेट परिणाम सोलापूर आणि विदर्भ मार्गावरील गाड्यांवर होणार आहे. सोलापूरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या, जसं की १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर एक्स्प्रेस आणि १२१५७/१२१५८ पुणे-सोलापूर एक्स्प्रेस, तसंच ११४१८ सोलापूर-पुणे डेमू या गाड्या १५ ते २५ जानेवारी दरम्यान पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, पुणे-दौंड आणि पुणे-बारामती दरम्यानच्या डेमू गाड्या देखील याच कालावधीत रद्द राहणार आहेत. विदर्भात जाणाऱ्या काही रेल्वेगाड्याही सुमारे १० दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
गाड्यांच्या मार्गात बदल आणि विलंब
रद्द झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त, पुणे-लखनऊ, पुणे-गोरखपूर, पुणे-आझाद हिंद आणि पुणे-हावडा यांसारख्या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पुणे-हटिया एक्स्प्रेस, पुणे-लखनऊ एक्स्प्रेस आणि पुणे-जबलपूर एक्स्प्रेस या गाड्या ४ ते २३ जानेवारीदरम्यान त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा दीड ते अडीच तास उशिराने सुटणार आहेत.
advertisement
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून, २२९४४ इंदूर-दौंड एक्स्प्रेस आणि २२१९४ ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस सारख्या काही गाड्या दौंडऐवजी खडकी स्थानकावर थांबणार (समाप्त होणार) आहेत. तर दौंडहून सुटणाऱ्या काही गाड्या खडकी येथून त्यांच्या पुढील प्रवासाला सुरुवात करतील. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक काळजीपूर्वक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 6:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Train: पुणेकरांसाठी 'महत्त्वाची सूचना'! दौंड-मनमाड दरम्यान रेल्वेचा पॉवरब्लॉक; 30 हून अधिक गाड्या रद्द


