8 एअरपोर्ट 48 तासांचं वेटिंग, 200 हून अधिक फ्लाइट अचानक रद्द, इंडिगोमध्ये नेमकं काय सुरू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंडिगोच्या तांत्रिक अडचणी, क्रू तुटवडा आणि नवीन नियमांमुळे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबादसह ८ विमानतळांवर २००हून अधिक फ्लाइट्स रद्द. प्रवाशांची गैरसोय.
सध्या जर तुम्ही विमान प्रवासाचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो दोन दिवसांपासून मोठ्या संकटात सापडली आहे. तांत्रिक अडचणी, खराब हवामान आणि क्रू मेंबर्सच्या तुटवड्यामुळे बुधवारपर्यंत कंपनीची ८ प्रमुख विमानतळांवर २०० हून अधिक विमाने रद्द झाली आहेत, तर शेकडो विमानांना प्रचंड उशीर झाला आहे. यामुळे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबादसह प्रमुख शहरांतील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत, ज्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
प्रवाशांची गैरसोय, इंडिगोकडून स्पष्टीकरण
बुधवारी एकट्या इंडिगोच्या १५० हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला, ज्यात बेंगळुरू ४२, दिल्ली ३८, मुंबई ३३, हैदराबाद १९, अहमदाबाद २५ यांसारख्या प्रमुख विमानतळावरुन फ्लाइट रद्द झाल्या किंवा रिशेड्युल झाल्या आहेत. इंडिगोने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे, पण त्याचसोबत पुढच्या ४८ तासांत परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होईल, असं आश्वासनही दिलं आहे. याचा अर्थ, प्रवाशांना अजून दोन दिवस वेटिंग करावं लागणार आहे.
advertisement

क्रूचा तुटवडा की नवीन नियम
इंडिगोच्या या गोंधळामागे पायलट आणि क्रू मेंबर्सचा तुटवडा हे मोठे कारण असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. डीजीसीएने थेट इंडिगोकडे यावर स्पष्टीकरण मागवले आहे. सरकारने फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नावाचे नवीन नियम १ नोव्हेंबरपासून लागू केले आहेत. यात पायलटच्या दररोजच्या उड्डाण वेळेत कपात करणे आणि केबिन क्रूसाठी १० तास विश्रांती अनिवार्य करणे समाविष्ट आहे. इंडिगोच्या शेड्युलिंग सिस्टीमला या नव्या नियमांनुसार स्वतःला जुळवून घेणे शक्य झाले नाही, परिणामी अनेक महत्त्वाच्या मार्गांवर अचानक क्रूची मोठी कमतरता भासू लागली.
advertisement
सिस्टीममध्येही बिघाड
केवळ क्रूचा तुटवडाच नव्हे, तर तांत्रिक अडचणींनीही प्रवाशांचा खोळंबा केला. बुधवारी दिल्ली, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि सुरत यांसारख्या ७ विमानतळांवर ऑटोमॅटिक चेक-इन सिस्टीममध्ये बिघाड झाला. यामुळे इंडिगोसोबतच स्पाइसजेट आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्याही विमानांना उशीर झाला. अखेरीस, चेक-इन प्रक्रिया मॅन्युअल पद्धतीने सुरू करावी लागली, ज्यामुळे प्रक्रिया संथ झाली आणि प्रवाशांच्या रांगा अधिक वाढल्या.
advertisement
देशातील ६०% उड्डाणे इंडिगोची
view commentsइंडिगो ही देशातील सर्वात मोठी एअरलाइन आहे. त्यांच्याकडे सर्वाधिक ४३४ विमाने असून, देशातील ६०% हून अधिक देशांतर्गत उड्डाणे इंडिगोमार्फत होतात. अशा महत्त्वाच्या कंपनीच्या ऑपरेशनमध्ये झालेला हा मोठा गोंधळ, देशातील हवाई वाहतुकीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. इंडिगोने ४८ तासांत ऑपरेशन सामान्य करण्याचे आश्वासन दिले असले तरी, प्रवाशांनी विमानतळावर लवकर पोहोचावे आणि प्रवास करण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 7:51 AM IST
मराठी बातम्या/देश/
8 एअरपोर्ट 48 तासांचं वेटिंग, 200 हून अधिक फ्लाइट अचानक रद्द, इंडिगोमध्ये नेमकं काय सुरू


