मराठा समाजाला इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, अशी मागणी करून मनोज जरांगे पाटील यांचे सहकाऱ्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीने सरकार कोंडीत सापडले आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या ताटातून काढून दुसऱ्या ताटात देण्याला छगन भुजबळ यांनी प्रखरपणे विरोध दर्शवला आहे. सोमवारी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा पुढचा लढा स्पष्ट केला.
advertisement
आरक्षण प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही मग ते फडणवीस असो वा शरद पवार...
मराठा आणि कुणबी यावर सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा मत स्पष्ट केले आहे. असे असताना जर मर्यादा ओलांडून जर मराठा समाजाला वाढीव आरक्षण दिले तर आम्ही मैदानावर उतरू. सरकारने जर तसा निर्णय घेण्याचे धाडस केले तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला. काही कुणबी आहेत, त्यांच्या नोंदी आहेत, त्यांच्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. मात्र सरसकट समाजाला कुणबी ठरवता येणार नाही, हे कायद्याने स्पष्ट असतानाही जर असा कुणी हट्ट करीत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. तसेच एखाद्या जातीला अमुक एका प्रवर्गात टाकणे हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. मग ते फडणवीस असो वा शरद पवार असो. उगीचच कोणत्याही शासनाला दोष देण्यात काही अर्थ नाही. आरक्षणाचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, असा दावा भुजबळ यांनी केला.
... तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ
ओबीसी आरक्षणात सरकारने कुणालाही वाटेकरी करू नये. जर सरकारने तसा काही निर्णय घेतला तर आम्हीही उपोषणे करणार, जिल्हा जिल्ह्यातून मिरवणुका काढू, लाखालाखांच्या लोंढ्यांनी मुंबईत येऊन आम्ही आमचा लढा तीव्र करू, असा इशारा भुजबळ यांनी दिला.