अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: वडिलांना भेटायला गावी आलेल्या पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाला. वडिलांशी कोणताही संपर्क होत नसल्याने कासावीस झालेल्या मुलाने पोलिसांच्या मदतीने वडिलांचा शोध घेतला. पण, समोर धक्कादायक घटना आली. या घटनेने पोलीसदेखील हादरून गेले. वैजापूरमधील या घटनेने एकच खळबळ उडाली.
advertisement
नेमकी घटना काय?
नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते सध्या छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव येथून कामावर ये-जा करत असत. १ जानेवारीपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या मूळगावी, म्हणजेच बळ्हेगावात आले होते. २ जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते, मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला.
असा लागला शोध
दोन दिवस वडील घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन लागत नसल्याने नानासाहेबांच्या मुलाने बळ्हेगावच्या सरपंचांशी संपर्क साधला. सरपंचांनी गावातील त्यांच्या घरी आणि भावांकडे चौकशी केली असता, "ते २ तारखेला गावी आले होते, मात्र त्यानंतर कुठे गेले माहिती नाही," अशी उत्तरे मिळाली. संशय बळवल्याने मुलाने पोलिसांत धाव घेतली.
तपासाचे थरारनाट्य: पलंगाखाली मोबाईल, अंगणात मृतदेह
रविवारी दुपारी शिऊर पोलिसांनी बळ्हेगाव येथील घराची झडती घेतली. तपासादरम्यान नानासाहेब यांचा मोबाईल घराच्या पलंगाखाली सापडला. त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसराजवळ शोध घेतला. त्यावेळी त्यांना घराशेजारील पडीक जागेत ताजी माती उकरलेली दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्या जागेचे खोदकाम केले असता, सायंकाळी ६:३० च्या सुमारास नानासाहेबांचा पुरलेला मृतदेह पोलिसांना आढळला.
तीन नातेवाईक ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, नातेवाइकांच्या जबाबात मोठी तफावत आढळल्याने पोलिसांनी संशयावरून नात्यातीलच तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून कौटुंबिक वादातून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शिऊर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
