जप्त केलेल्या पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सणांच्या काळात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी बनावट, भेसळयुक्त पदार्थ निर्मिती केली जाते. सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील आणि सहआयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. वाळूज एमआयडीसीमध्ये हा कारखाना सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी एफडीएने छापा टाकला. कारवाईत जप्त केलेल्या पनीरचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
advertisement
यंदाच्या सणांच्या काळातील ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, फरीद सिद्दिकी यांचा सहभाग होता. जिल्हा दूध संघाकडून दिलेल्या माहितीनुसार, शहरात दरमहा सुमारे 5 हजार किलो पनीर विकले जाते. सणांच्या काळात ही विक्री 20 हजार किलोपर्यंत पोहोचते. शहरात 350 हून अधिक डेअरी आहेत. तेथे सुटे पनीर विकले जाते.
जप्त केलेल्या पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. 14 दिवसांत त्याचा अहवाल येईल. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. प्राथमिक तपासात हे पनीर कृत्रिम असल्याचा अंदाज आहे. संबंधित कारखान्यात मानांकनानुसार स्वच्छता नव्हती, असं सहायक आयुक्त विवेक पाटील म्हणाले.
असे ओळखा पनीर शुद्ध आहे की बनावट
खरे पनीर स्पर्श केल्यास मऊ लागते, तर कृत्रिम पनीर रवाळ लागते. पनीर कृत्रिम असल्यास आयोडिन टाकल्यावर रंग निळा किंवा काळा पडतो.
कृत्रिम पनीर तव्यावर टाकल्यास पाणी सोडते, त्याचबरोबर फेसही निघतो.
कृत्रिम पनीरमध्ये व्हेजिटेबल फॅट्स किंवा तेलाचा गंध येतो.