ही घटना शहरात दुसऱ्यांदा घडली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात कार पार्किंगवरून झालेल्या वाहतुकीच्या कोंडीतून हा वाद सुरू झाला. वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला, जिथे आरोपींनी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला मारहाण केली. आरोपींनी पोलीस ठाण्यातील संगणक तोडण्याचा आणि कागदपत्रांची फेकझोक करण्याचाही प्रयत्न केला.
या मारहाणीत जखमी झालेल्या फौजदारावर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहराच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
पोलीस ठाण्यात घुसून महिला पोलिसाचा गळा दाबला
दुसऱ्या घटनेत, सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेने आणि तिच्या नातेवाइकांनी पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत महिला पोलीस कर्मचारी बेशुद्ध झाली. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलिसांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संबंधित महिलेने आणि तिच्यासोबत आलेल्या दोन नातेवाइकांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून तिला मारहाण केली. ही मारहाण इतकी भयानक होती की, महिला पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेसह तिच्या दोन नातेवाइकांविरुद्ध सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
