चार किलो बिर्याणीसाठी लागणारे साहित्य
चार किलो तांदूळ (सुट्टे शिजवून घ्यावे), चार किलो चिकन, दीड किलो बारीक चिरलेला कांदा, दीड किलो टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, घरगुती गरम मसाला, धने-जिरे पावडर, दही, कोथिंबीर, पुदिना, खडा मसाला, मीठ, कढीपत्ता, हळद, तेल आणि जिरे हे साहित्य लागेल.
advertisement
बिर्याणीसाठी कृती
सुरुवातीला मोठा टोप (सुमारे दहा किलोचा) गरम करून त्यात एक लिटर तेल ओता. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, कढीपत्ता आणि खडा मसाला टाका. यानंतर आले-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा टाकून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
कांदा सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटो घालून नीट एकजीव होईपर्यंत परता. मग गरम मसाला, धने-जिरे पावडर आणि दही टाकून मसाला नीट भाजून घ्या. यानंतर कोथिंबीर आणि पुदिना मिसळून चिकन घालावे. चिकन आणि मसाला हे नीट शिजल्यावर त्यात आवश्यक तेवढं पाणी घाला. नंतर आधीपासून शिजवलेला भात थरांमध्ये टाकून वर-खाली एकजीव करून घ्या. थर लावताना मध्ये थोडी कोथिंबीर, पुदिना आणि शेवटी तुपाची हलकी धार सोडा.
नंतर झाकण ठेवून मंद आचेवर काही वेळ दमाला ठेवा. काही मिनिटांतच हॉटेलसारखी सुगंधी, स्वादिष्ट आणि झटपट बनणारी चार किलोची बिर्याणी तयार होईल.





