छत्रपती संभाजीनगर : आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. भारतासह जगात प्रगती होत आहे. पण अजूनही काही लोकांची मानसिकता ही बदललेली दिसत नाही. आजही लोकांना वंशाचा दिवा हवा असतो. मुली या मुलांच्या खांद्याला खांदा लावून आहेत. तरीसुद्धा समाजातील काही लोकांना आजही मुलगा हवा असतो.
काही महिला तर लेबर टेबलवर असल्यावर पहिला प्रश्न विचारतात की, मुलगा झाला की मुलगी? तर नेमकी यामागचे काय कारण आहेत, लोकांची अशी मानसिकता काय आहे, याविषयी प्रस्तुतीतज्ञ डॉक्टर रश्मी बोरीकर यांनी माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आज आपण खूप पुढे गेलेलो आहोत. पण समाजातील काही लोकांची मानसिकता अजूनही बदलली दिसत नाही. मी या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करते. माझ्या असं लक्षात आलं आहे की, काही महिला या लेबर टेबलवर असल्यावर, मुलगा झाला की मुलगी झाली हा पहिला प्रश्न विचारतात. त्या ठिकाणी महिलांना प्रचंड वेदना होत असतात. पण मुलगा की मुलगी हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. माझं बाळ सुखरूप आहे का, ते व्यवस्थित आहे का, हा पहिला प्रश्न महिलांनी विचारायला हवा. पण असं न विचारता महिला याउलट विचारतात, असे डॉ. रश्मी यांनी सांगितले.
काय आहे यामागचे कारण -
यामागचे मुख्य कारण काय आहे, याबाबत बोलताना डॉ. रश्मी यांनी सांगितले की, आजही समाजातील काही लोकांची मानसिकता अशी बदललेली नाही. मुलगा झाला म्हणजे सगळेच झाले, असे लोकांना वाटते. महिलांना देखील वाटते की, मला मुलगा झाला तर माझे खूप मोठे टेन्शन जाईल, मला कुठलाही दबाव हा कुटुंबाकडून येणार नाही. तसेच यामुळे मला माझं आयुष्य व्यवस्थित जगता येईल, अशी महिलांची मानसिकता असते. मात्र, महिलांनी आपली मानसिकता बदलायला हवी.
तसेच समाजातील पुरुषांनीही मानसिकता बदलली पाहिजे. समाजाने आपली मानसिकता बदलावी आणि मुलगा झाला तरी चांगलंच आहे आणि मुलगी झालं तरी चांगलंच आहे. दोघांनाही समान वागणूक द्यायला ही हवी. हा जो भेदभाव नष्ट व्हायला हवा, असं मला वाटतं असल्याचे त्या म्हणाल्या.