छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल परिसरामध्ये सुनंदा शिंदे राहतात. त्या शिवणकाम करतात. या कामातून झालेली कमाई त्यांनी आदर्श पतसंस्थेत टाकली होती. पै पै जमवत यामध्ये तब्बल 22 लाख रुपयांची ठेव झाली होती. या बँकेमध्ये जास्त व्याज देत असल्यामुळे त्यांनी पैसे गुंतवले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं 16 टक्के व्याजदर होता. त्यामुळे बँकेमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी होत्या.
advertisement
ऐंशी वर्षीय सुनंदा शिंदे सांगतात की, “मी या बँकेमध्ये 22 लाख जमा केले होते. मी मशीन काम करून हे सर्व पैसे जमा केले होते आणि त्या बँकेमध्ये टाकले होते. सुरुवातीला बँकेने आम्हाला चांगलं व्याज दिलं. पण हळूहळू व्याज कमी करायला सुरुवात केली. एक दिवस आम्हाला अचानक समजलं की बँक बुडाली आहे. तेव्हा आम्हाला खूप धक्का बसला. आमचे पैसे परत मिळावेत म्हणून आम्ही खूप उपोषण केले. आंदोलने केली. पण अजून देखील आम्हाला आमचा परतावा मिळाला नाही.”
सुनंदा आजी पुढे सांगतात की, “पैसे बुडाल्याच्या धक्क्याने पतीला पॅरलेसिस अटॅक आला. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला आणि त्यांचं निधन झालं. माझ्या नवऱ्यासारख्या अजून 90 हून अधिक वयोवृद्धांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. णि बुधवारी, म्हणजे 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. तसेच त्या पत्रावर त्यांच्याकडून आम्हाला काय मदत करणार आहात? हे लिहून घेणार असल्याचं सुनंदा आजी सांगतात.
“माझी आयुष्यभराचे जमापुंजी यामध्ये टाकली आणि ती आता मला मिळत नाही. त्यामुळे मला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मला प्रत्येक वेळेस मुलांसमोर पैशासाठी हात पसरावे लागतात. औषध - गोळ्यांसाठी देखील त्यांना पैसे मागावे लागतात. माझे पैसे असून देखील मला ते भेटत नाहीत. त्या करिता आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही सुनंदा शिंदे आजी सांगतात.