अपहरण झालेल्या तरुणाचे नाव विशाल आबासाहेब येडके (वय 23, रा. मिसारवाडी) असे असून तो सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्टा सेंटरवर काम करतो. विशालचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
भाडेकरू बनून यायचे अन् मालकाचाच गेम करायचे; ‘बंटी-बबली’चे कारनामे पाहाल, तर धक्का बसेल!
फिर्यादी सुरेश नरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अचानक पांढऱ्या रंगाची कार नाष्टा सेंटरजवळ आली. त्यातून उतरलेल्या महिलेसह 10 ते 12 जणांनी विशालला मारहाण केली आणि त्याला गाडीत बसवून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
अपहरणानंतर आरोपींनी विशालला कारमधून सातारा परिसरात नेले. प्रवासादरम्यान तसेच तेथे पोहोचल्यानंतर आणखी काही जणांना बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे विशालने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्याला सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली सोडून दिले. त्यानंतर विशालने आपल्या मामाला फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. मामा नरवडे यांनी त्याला तात्काळ पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली.
या अपहरणामागे जुन्या वादाचा बदला असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमारे एक वर्षापूर्वी विशाल आणि संबंधित तरुणी घरातून पळून गेले होते. त्या वेळी मध्यस्थी करून दोघांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते आणि तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतरही आरोपींच्या मनात राग कायम राहिल्याने सूडाच्या भावनेतून हे अपहरण करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.






