भाडेकरू बनून यायचे अन् मालकाचाच गेम करायचे; ‘बंटी-बबली’चे कारनामे पाहाल, तर धक्का बसेल!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: भाडेकरून म्हणून येऊन घरमालकालाच लुटणाऱ्या बंटी-बबली दाम्पत्याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने घरमालकाचा विश्वास जिंकून त्यांना लुटणाऱ्या एका सराईत 'बंटी-बबली' दांपत्याला वाळूज पोलिसांनी अखेर मुंबईतील भांडूप येथून अटक केली आहे. आरोपी दांपत्याने वाळूजमधील एका घरात अवघ्या महिनाभरासाठी भाड्याने मुक्काम केला. घरमालकाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी घरातून सुमारे 65 हजार रुपये रोख आणि दागिने चोरून पलायन केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती आरोपींचा ठावठिकाणा लागला आणि भांडूप येथे जाऊन नवनीत मधुकर नाईक (वय 45) व त्याची पत्नी स्मिता नाईक (वय 41) यांना अटक करण्यात आली.
तपासात उघड झाले की हे दांपत्य मूळचे मुंबईतील भांडूप परिसरातील असून, ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान त्यांनी वाळूजमधील एका घरात भाड्याने वास्तव्यासाठी प्रवेश केला होता. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वाळूज पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे करत आहेत.
advertisement
वाळूज पोलिसांनी भांडूप येथील त्यांच्या घरी तपासणी केली असता, त्यांच्या मालकीचा प्लॉट असून त्यांचे आई-वडील आणि मुलगा आदित्य (20) हे तेथे राहतात. त्यांच्या चोरट्या वृत्तीमुळे त्यांचे आई-वडील त्यांना घरात राहू देत नाहीत. परिणामी, हे दोघे सतत नवीन ठिकाणी नाव बदलून भाड्याने राहत आणि घरमालकांना लुबाडून पसार होत. विशेष म्हणजे हा त्यांचा व्यवसाय बनला होता.
advertisement
राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत या दांपत्याविरोधात 20 ते 25 चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. उरण पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात ते आधीच अटकेत असल्याची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तळोजा व कल्याण कारागृहातून त्यांचा ताबा घेतला. चौकशीतून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात सोन्याचे व चांदीचे दागिने समाविष्ट आहेत.
advertisement
अशी करायचे चोरी
नाईक दांपत्य अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करत असल्याचेही उघड झाले आहे. ‘कामाच्या शोधात आलो आहोत’ अशी भावनिक कहाणी सांगून ते घरमालकांची सहानुभूती मिळवत. घरात राहून मालकांची दिनचर्या, मौल्यवान वस्तूंची जागा आणि योग्य संधी यांची माहिती मिळवून चोरी करून पसार होणे, हाच त्यांचा ठरलेला पॅटर्न होता.
दरम्यान, ही कारवाई वाळूजचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अजय शितोळे, पोशि. रमेश राठोड, संदीप वाघ, विजय पिंपळे यांच्या टीमने केली.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 13, 2025 1:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
भाडेकरू बनून यायचे अन् मालकाचाच गेम करायचे; ‘बंटी-बबली’चे कारनामे पाहाल, तर धक्का बसेल!









