जवाहरनगर पोलीस ठाण्याकडे मोबाईल हरविल्याच्या व चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवली. या तपासादरम्यान काही मोबाईल फोन जिल्ह्यातील विविध भागांतून तर काही मोबाईल बाहेरील राज्यातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
advertisement
शोधून काढलेल्या या 16 मोबाईल फोनचे वितरण आज जवाहरनगर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन सुपूर्द करण्यात आले.
विशेष म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधत परत करण्यात आलेल्या एकूण मोबाईलपैकी 9 मोबाईल महिला तक्रारदारांना देण्यात आले. अचानक हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
दरम्यान, नागरिकांनी मोबाईल हरविल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. जवाहरनगर पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी त्यांचं कौतुक देखील केलेला आहे.





