छत्रपती संभाजीनगरमधील इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी सतत मोबाईलवर रिल्स पाहात होती. घरी कुणालाही न सांगता ती मैत्रिणीच्या घरी गेली म्हणून आजोबा रागावले. तर दुसऱ्या दिवशी मोबाईल पाहण्यावरून आई आणि आजी देखील रागावली. त्यावर मुलीने टोकाचा निर्णय घेत थेट घर सोडले. तिने एम-2 परिसरातील एका मंदिरात रात्र काढली. मुलगी घरातून गेल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, कुठेच पत्ता न लागल्याने आईने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्या पथकाने मुलीचा शोध घेतला. मुलीला शोधून तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमधील अशा घटनांवर पुन्हा लक्ष वेधले आहे. गेल्या आठवडाभरात शहरातील विविध भागात 3 अल्पवयीन मुलांनी रागाच्या भरात घर सोडले. शहर पोलिसांच्या सतर्कतेने सर्व मुले सुखरुप घरी पोहोचली आहेत. मात्र, कुटुंबीयांशी विसंवाद हा चिंतेचा विषय बनत आहे.
कुटुंबीयांशी विसंवाद, मुलांचं टोकाचं पाऊल
1) अभ्यासासाठी आई रागावल्याच्या कारणावरून विशाखा अनिल वक्ते या 18 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 14 सप्टेंबर रोजी वडगाव कोल्हाटी भागात हा प्रकार उघडकीस आला.
2) बारावीतील विद्यार्थ्याने आई-वडिलांबरोबर वाढदिवस साजरा केला. पण त्याला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मोबाईल हवा होता. मात्र पालकांनी त्याला मोबाईल घेऊन दिला नाही. त्यामुळे रागाच्या भरात या विद्यार्थ्यांने घर सोडले. त्यामुळे पोलिसांत तक्रारी दिली. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो रेल्वे पोलिसांना नांदेड रेल्वे स्टेशनवर आढळला.
3) 11 वर्षांच्या मुलाने घरातून 200 रुपये घेतल्याने आई रागावली. त्यानंतर मुलगा रात्री घराबाहेर पडला व परत आला नाही. कुटुंबीयांनी त्याचा घराच्या आजूबाजूला, एमआयडीसी वाळूज परिसरात तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक, मित्र-नातेवाइकांकडे शोध घेतला. दरम्यान तो मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर आढळला आहे. त्याच्या नातेवाइकांसह पोलिसांचे पथक त्यास परत आणण्यासाठी रवाना झाले आहे.