रिहान आणि इम्रान हे दोघे जिवलग मित्र होते. इम्रान हा सुमारे चार महिन्यांपूर्वी आपल्या आई-वडिलांसह नायगाव येथे राहण्यासाठी आला होता. तो येथे पेंटिंगचे काम करत होता. तर रिहान हा बायजीपुरा परिसरात लाइट फिटिंगचे काम करून उपजीविका करत होता.
घरात रात्री एकटी झोपली होती, ‘तो’ आला अन् 80 वर्षांच्या वृद्धेसोबत भयंकर कृत्य, छ. संभाजीनगरात संताप
advertisement
गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोघेही नायगावहून गणोरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांना चिंता लागली होती. शुक्रवारी सकाळी दोघेही तलावात बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
पोलिस निरीक्षक संजय सहाणे आणि पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी अग्निशमन विभागाची मदत घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम, ड्युटी अधिकारी संजय कुलकर्णी तसेच अग्निशामक जवान सूरज राठोड, सचिन शिंदे, शिवसंभा कल्याणकर, विजय कोथमिरे, गोपीचंद मोरे, जगदीश गायकवाड आणि मोहम्मद दुशाज यांच्या पथकाने तलावात शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन तास चाललेल्या प्रयत्नांनंतर पथकाला दोन्ही तरुणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, दोघांचे मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी बायजीपुरा परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची नोंद फुलंब्री पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे करीत आहेत.






