अजय पांडुरंग बोरकर असं मृत पावलेल्या २३ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो राहेगावचे माजी उपसरंपच पांडुरंग बोरकर यांचा मुलगा आहे. घटनेच्या दिवशी अजय आपल्या इतर दोन मित्रांसोबत ढेकू नदीत पोहण्यासाठी गेला होता. पण पोहता न आल्याने उपसरपंचाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथे असलेल्या ढेकू नदीपात्रात घडली.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
घटनेच्या दिवशी मयत अजय बोरकर हा आपला मित्र अक्षय बाळू शेलार आणि ओम सतीश बोरकर यांच्यासोबत ढेकू नदीवर गेला होता. अजयला पोहता येत नव्हतं. तरीही तो अक्षय आणि ओमसोबत नदीच्या पाण्यात शिरला. पण सध्या अतिवृष्टीमुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. अशात खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही तरुण ढेकू नदीत वाहून जाऊ लागले.
यानंतर तिघांनीही आरडाओरडा करायला सुरुवात केली. यावेळी आसपासच्या लोकांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी अक्षय आणि ओमला सुखरुपणे पाण्यातून बाहेर काढलं. मात्र ते अजयला वाचवू शकले नाहीत. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्न करत अजय बोरकरचा मृतदेह शोधून काढला. उपसरपंचाच्या मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.