छत्रपती संभाजीनगर : देशातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे तो चिंतेचा विषय ठरतोय. देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन निवृत्त अधिकाऱ्याने तब्बल 4 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून सुरू झालेला हा सायकल प्रवास 4 हजार किलोमीटर असलेल्या नर्मदा परिक्रमा येथे संपला. आराम करण्याच्या वयात तरुणांसाठी संदेश घेऊन केलेल्या सायकल प्रवासामुळे या निवृत्त अधिकाऱ्याचे जिल्ह्यात कौतुक होतंय.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणपती बोरगाव हे दिनकर बिरारे यांचा मूळ गाव असून आई वडिलांची परिस्थिती नाजूक होती. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी शेतात काम करून 10 पर्यंत शिक्षण मामाकडे पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलमध्ये काम करून पुढील शिक्षण पूर्ण केलं. नोकरी लागल्यानंतर पदोन्नती मिळत त्यांनी क्षेत्रीय अधिकारी झाल्यानंतर प्रामाणिकपणे काम केलं. शासकीय कार्यालयाने शासकीय वाहन देऊन बिरारे कार्यालयात पायी किंवा रिक्षाने ये-जा करत होते. क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करत तब्बल 36 वर्षानंतर दिनकर बिरारे निवृत्त झाले. 69 व्या वर्षात पदार्पण करेपर्यंत त्यांनी कुठलाही व्यसन केलं नाही. यामुळे आजपर्यंत मला कुठलाच आजार झाला नाही असं ते अभिमानाने सांगतात.
देशात भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो मात्र याच तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. हीच व्यसनाधीनता देशातील भविष्यासाठी संकट ठरू शकते. यामुळे तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन दिनकर बिरारे यांनी 4 हजार किलोमीटरचा प्रवास केला. छत्रपती संभाजीनगरपासून सायकलवर सुरू झालेला हा प्रवास ओंकारेश्वर अमरकंटक परत ओंकारेश्वर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला परत आले. प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्यात भेटणाऱ्या तरुणांना निर्व्यसनी आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला.
देशातील तरुणांसाठी मी संकल्प केला होता. आज चार हजार किलोमीटरचा प्रवास करून मी घरी परतल्याने मला आनंद वाटत आहे. या प्रवासात मला कुठलाच थकवा जाणवला नाही. भविष्यात तरुणांनी निर्व्यसने राहावं यासाठी जनजागृती करेल, असा विश्वास निवृत्त अधिकारी दिनकर बिरारे यांनी व्यक्त केला आहे.
वडिलांचे वय आज 69 वर्षे आहे. या वयात त्यांनी आराम करावा अशी आमची इच्छा आहे. नर्मदा परिक्रमाचा प्रवास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर आम्ही त्यांना नकार दिला मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. वडिलांनी आम्हाला सोडून आजपर्यंत कधीच प्रवास केला नाही. त्यांच्या या प्रवासादरम्यान आम्हाला प्रचंड काळजी वाटत होती. त्यांचा प्रवास सुखरूप झाला आज ते घरी आल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असं त्यांची मुलगी किर्ती बिरारे-जाधव यांनी सांगितलं.