छत्रपती संभाजीनगर : सध्याला सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. आपल्या अवतीभोवती अनेक अशी लग्नं होत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात देखील एक लग्न झालेलं आहे. पण या लग्नाची गोष्ट जरा वेगळी आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पूजा आणि अण्णासाहेब यांच्या लग्नाची गोष्ट विशेष म्हणजे पूजाच्या लग्नामध्ये तिचं कन्यादान हे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांच्या पत्नी यांनी केलेलं आहे.
advertisement
पूजा ही एक अनाथ मुलगी. पैठण येथील बालगृहात तिचे बालपण गेले. तेथेच तिचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या 18 व्या वर्षानंतर ती महिला बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहामध्ये आली. येथे महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पूजाने येथे फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
परिस्थितीवर मात केली, जिद्दीने पुढे गेली, आता 30 मुलांची आई, कोण आहे पिंकी भोसले?
पूजा, शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातली कन्या आणि अण्णासाहेब सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा सुपुत्र यांचा शुभविवाह आज सिडको एन-4 मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिवचनांच्या वर्षावात आशिर्वादरूपी अक्षदांचे शिंपण होऊन पार पडला.
वर अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. आधी सोमवारी (दि.३) नोंदणी विवाह करण्यात आला. विवाहाला पारंपरिक संस्कारांचे स्वरूप मिळावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील गोपीनाथ मुंडे मंगल कार्यालयात विधिवत समारंभ पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाहप्रसंगी कन्यादान केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या. कन्यादानाच्या सर्व विधीत त्या सहभागी होत्या. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली. या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झंवर, कांचन साठे, रश्मी कुमारी, कविता वाघ यांनी सहकार्य केले. सध्याला या विवाह सोहळ्याची सर्वच ठिकाणी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आणि महिला बालविकास यांच्या पुढाकारामुळे पूजाला तिचा हक्काचं घर मिळालेलं आहे. तसंच अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा विवाह सोहळा पार पाडलेला आहे आणि जिल्हाधिकारी यांचे देखील खूप कौतुक केलं जात आहे.