नियतीचा क्रूर आघात
बीड येथील रहिवासी असलेल्या विशाखा वंजारे हिचे लिव्हर गेल्या वर्षी निकामी झाले होते. त्यावेळी तिच्या वडिलांनी स्वतःचे लिव्हर दान करून तिला जीवदान दिले होते. या प्रत्यारोपणानंतर विशाखाची प्रकृती स्थिर झाली होती आणि पुढील शिक्षणासाठी ती छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. ती सध्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. वडिलांनी जीवदान दिल्यानंतर अवघ्या वर्षभरातच विशाखाचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
advertisement
अपघात नेमका कसा झाला?
शेंद्रा येथील पीपल्स फॉरेन सिक्स सायन्स महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विशाखा वंजारे, सानवी शिंगारे आणि अपेक्षा जमधडे या तिघी कुंभेफळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. सोमवारी मध्यरात्री त्या काही मित्रांसोबत चहा घेण्यासाठी खोलीबाहेर पडल्या होत्या. एका मित्राला चहाच्या दुकानावर थांबवून त्या तिघी ट्रिपल सीट स्कुटीवरून त्याच्याकडे जात होत्या. याचवेळी समोरून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला हुल दिली. त्याच क्षणी पाठीमागून ओव्हरटेक करत येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाला स्कुटी दिसली नाही आणि त्याने स्कुटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघीही फरफटत घासल्या गेल्या आणि एकीचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान विशाखाचा मृत्यू
या भीषण अपघातात तिन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यांचे मित्र आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विशाखाचा मृत्यू झाला. सानवी शिंगारे आणि अपेक्षा जमधडे या दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
