कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल आलं कुठून?
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल आले कुठून, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलिसांनी 'समृद्धी' महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल पुरवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, हे पिस्तूल या दोन्ही कर्मचाऱ्यांकडे कसे आले आणि त्यांचा उद्देश काय होता, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
advertisement
पिस्तुलातून गोळी सुटली अन्...
प्राथमिक माहितीनुसार, भरत घाटगे आणि पळून गेलेला दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर झटापटीत झाले. नेमक्या याच वेळी, दुसऱ्या कर्मचाऱ्याजवळ असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली आणि ती घाटगे यांच्या पोटात लागली. वादाचे नेमके कारण आणि त्यातून थेट गोळीबार का करण्यात आला, हे अजूनही अस्पष्ट आहे.
आरोपीचा कसून शोध
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, फरार झालेल्या आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे टोलनाक्यांवरील सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांकडील अवैध शस्त्रास्त्रांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
