मिळालेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या आविष्कार कॉलनीतील खोलीत सुसाइड नोट लिहून निकिता रवींद्र पवार (२४, रा. वांजुळपोई, जि. - अहिल्यानगर) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मित्र श्रेयस दिलीप पुराणे (रा. करंजगाव, जि. अहिल्यानगर) - हा तिला वारंवार फोन करून, 'तू माझ्याशी - पूर्वीसारखे संबंध ठेवले नाही तर आपले व्हिडिओ व्हायरल करतो,' अशी धमकी देत होता. त्यामुळे निकिताने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
advertisement
मृत निकिताचा भाऊ फिर्यादी ओम रवींद्र पवार याच्या तक्रारीवरून श्रेयस पुराणेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजगाव येथे बारावीत शिकताना निकिताची आरोपी श्रेयससोबत मैत्री झाली होती. तो तिला, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणायचा. निकिताने ही बाब अनेक वेळा घरी सांगितली. मात्र, घरच्यांची लक्ष दिले नाही. निकिता शहरात आली, त्यानंतर देखील पुराणे तिला वारंवार फोन करून, 'आपले पहिले रिलेशन तसेच ठेऊ, लग्नाचे नंतर बघू,' असे म्हणत असल्याचे निकिताने भावाला ५ सप्टेंबरला फोनवर सांगितले होते.
पूर्वीप्रमाणे संबंध ठेवले नाही तर आपले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत असल्याने मन:स्थिती बिघडल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यानंतर तिने ७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी श्रेयसविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.