छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक व्यक्तीला एखादा छंद असतो आणि बरेचजण तो जपण्याचा प्रयत्न करत असतात. काहीजणांना लिखाणाचा, वाचनाचा किंवा कविता करण्याचा देखील छंद असतो. असाच एक छंद छत्रपती संभाजीनगर शहरातील सुनील उबाळे यांना देखील आहे. त्यांना कवितांचा छंद आहे. त्यामुळे त्यांनी हा छंद अनोख्या पद्धतीनं जोपासला आहे. आपल्या घराच्या भिंतींवर सर्व कवींची नावेच त्यांनी लिहिली आहेत. याबाबतच लोकल18 सोबत बोलताना सुनील उबाळे यांनी माहिती दिलीये.
advertisement
छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे हे लोकांच्या घरांना रंग देण्याचा काम करतात. “मला लहानपणापासूनच कवितांची आवड आहे. मी शाळेत असल्यापासून कविता करायचो. पण वडील गेल्यानंतर घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरती पडली. यामुळे शाळा सोडावी लागली आणि काम करावे लागले. पण शाळा सोडावी लागली तरी देखील मी कविता करत होतो,” असं उबाळे सांगतात.
कुटुंबीयांचा विरोध पत्करुन 500 रुपयांत सुरू केला व्यवसाय, महिन्याला कमवतोय 2 लाख!
सुनील उबाळे यांच्या घराच्या भिंतीवरती पहिले कविता लिहिलेल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या घराची ओळख कवितांचे घर म्हणून झाली. पण त्यांच्या शेजाऱ्यांनी जेव्हा घराचे बांधकाम काढलं तेव्हा त्यांच्या घराची भिंत पडली म्हणून त्यांना नवीन भिंत बांधावी लागली. पण त्यांना आता कविता न लिहिता वेगळं काहीतरी करायचं होतं. मग त्यांनी घराच्या छतावर महाराष्ट्रातील कवींची नावं लिहिण्याचा निर्णय घेतला, असं ते सांगतात.
घराच्या छतावर मराठी कवींची नावं टाकण्याचा निर्णय घेतला. पण, घरावर पत्रे होते. त्यावर लिहिता येत नव्हतं. त्यामुळे घराला आधी पीओपी करून घेतलं आणि त्यानंतर त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि कवियत्री यांची नावे टाकली आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक देखील होतंय.
उबाळे यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. तर त्यांनी आतापर्यंत अडीचशे कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी 150 पर्यंत कविता संग्रहित असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या कवितांसाठी त्यांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्यासोबत माझं संपूर्ण कुटूंब उभं होतं. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथी दिलेली आहे आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे, असंही उबाळे सांगतात.