इराण युद्ध भडकलं, मद्यप्रेमींचं टेन्शन वाढलं, 'ओली पार्टी' वर संकट, नेमकं कारण काय?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Liquor Shortage: इराण युद्धाचा फटका मद्य व्यवसायाला देखील बसला आहे. युद्ध थांबले तरी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसू लागण्याची चिन्हे आहेत. इराण-इस्रायल संघर्षामुळे औद्योगिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या कॅन आणि काचेच्या बाटल्यांचा साठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कंपन्यांकडे केवळ 15 दिवसांसाठी उरल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काळात उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, युद्ध थांबले तरी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा राज्यातील महत्त्वाच्या मद्यनिर्मिती केंद्रांपैकी एक मानला जातो. वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक नामांकित व्हिस्की आणि बीअर कंपन्यांचे उत्पादन सुरू असते. या उद्योगातून राज्य शासनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
advertisement
मध्यपूर्व देशांकडे काही प्रमुख कंपन्यांकडून साधारणपणे 50 कंटेनरद्वारे मद्याचा पुरवठा केला जातो; मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यापैकी सुमारे 40 कंटेनरचा पुरवठा थांबविण्याच्या सूचना कंपन्यांना मिळाल्या आहेत. याशिवाय, जेएनपीटी बंदरावर आधीच पोहोचलेले पाच ते सहा कंटेनर अडकून पडल्याची माहिती मिळते. 17 फेब्रुवारी रोजी रवाना झालेले दोन कंटेनर मात्र सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
संभाजीनगरमध्ये 12 कंपन्या
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या सहा व्हिस्की आणि सहा बीअर उत्पादन करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. 2025 च्या अखेरीपर्यंत येथे जवळपास 4732.83 कोटी रुपयांचे मद्य उत्पादन झाले होते. त्यामध्ये विदेशी मद्याचे सुमारे 1.26 कोटी लिटर तर बीअरचे 1.40 कोटी लिटर उत्पादन नोंदवले गेले आहे.
मद्यनिर्मिती प्रक्रियेत काचेच्या बाटल्या आणि अॅल्युमिनियम कॅन तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर केला जातो. बाटल्यांना विशिष्ट आकार देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उच्च तापमानाच्या गॅसचा पुरवठा खंडित झाला तर उत्पादन प्रक्रियेलाच फटका बसू शकतो. सध्या जिल्ह्यातील कंपन्यांकडे अशा साहित्याचा साठा केवळ पंधरा दिवसांपुरता असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
मद्याचा तुटवडा कायम राहिला तर उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन दरमहा सुमारे 200 कोटी रुपयांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपलब्ध साठ्यावर पुढील पंधरा दिवसांत अंदाजे दीड लाख केसेसचे उत्पादन होऊ शकते. एका केसमध्ये 24 कॅन किंवा 12 बाटल्या असतात. त्यामुळे पुरवठा साखळी लवकर सुरळीत न झाल्यास स्थानिक मद्यउद्योगावर आर्थिक दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
इराण युद्ध भडकलं, मद्यप्रेमींचं टेन्शन वाढलं, 'ओली पार्टी' वर संकट, नेमकं कारण काय?








