हिंजवडी आयटी पार्कमध्ये जेवणाचे वांदे! कॅफेटेरिया-फूड कोर्टाला लागले टाळे? कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना 'तो' मेल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील बड्या कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे. या कंपन्यांवर आपल्या कॅफेटेरिया आणि फूड कोर्टवर टाळे लावण्याची नामुष्की ओढवली आहे.
(गोविंद वाकडे, प्रतिनिधी) पुणे : शहरातील हॉटेल व्यवसायानंतर आता गॅस टंचाईच्या झळा पुण्याच्या 'आयटी हब'ला म्हणजे हिंजवडीलाही बसू लागल्याचं समोर आलं आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील बड्या कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे. या कंपन्यांवर आपल्या कॅफेटेरिया आणि फूड कोर्टवर टाळे लावण्याची नामुष्की ओढवली आहे. काही कंपन्यांनी तर थेट मेल पाठवून कर्मचाऱ्यांना 'घरून डबा आणण्याचा' सल्ला दिला आहे.
आयटी कंपन्यांमध्ये सध्या 'रिटर्न टू ऑफिस' धोरणामुळे हजारो कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत आहेत. मात्र, गॅसअभावी कॅम्पसमध्ये स्वयंपाक करणं अशक्य झाल्यानं अनेक फूड कोर्ट्सनी जेवणाचे पर्याय मर्यादित केले आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी कंपनी बाहेरील किचनमधून जेवण मागवण्याचे प्रयत्न करत आहेत. कार्यालयीन कार्यक्रम किंवा मीटिंगसाठी दिल्या जाणाऱ्या केटरिंग सेवा सध्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे विशेषतः परराज्यातून आलेल्या आणि बॅचलर्स म्हणून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
advertisement
या बिकट परिस्थितीमुळे 'फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज' (FITE) आक्रमक झाली आहे. जोपर्यंत गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' (WFH) देण्याची मागणी त्यांनी केली आहे. खाण्यापिण्याच्या या आबाळीमुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गॅस पुरवठा कधी सुरळीत होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेले हे इंधन संकट आता पुण्याच्या आयटी क्षेत्राचा 'डब्बा' गुल करत असल्याने व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 12:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हिंजवडी आयटी पार्कमध्ये जेवणाचे वांदे! कॅफेटेरिया-फूड कोर्टाला लागले टाळे? कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना 'तो' मेल








