जेवणानंतर सासूसोबत शतपावली करणं पडलं 3 लाखांना, संभाजीनगरमध्ये तरुणीसोबत विचित्र प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका विवाहित तरुणीला रात्री जेवणानंतर घरासमोर शतपावली करणं चांगलंच महागात पडलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका विवाहित तरुणीला रात्री जेवणानंतर घरासमोर शतपावली करणं चांगलंच महागात पडलं आहे. सासूसोबत शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचं गंठण हिसकावलं आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या उल्कानगरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी कृष्णा टेहरे (वय २५) या मंगळवारी (१० मार्च) रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या सासू शोभा टेहरे यांच्यासोबत जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी निघाल्या होत्या. विश्वभारती कॉलनी जवळील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील जोधपूर स्वीट्ससमोरून त्या रोपळेकर चौकाकडे पायी जात होत्या.
त्यावेळी समोरून एका दुचाकीवर दोन तरुण आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने संधी साधून पल्लवी यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जोरात हिसकावले. काही कळण्याच्या आतच दोन्ही चोरटे चेतक घोडा चौकाच्या दिशेने वेगाने पसार झाले. चोरून नेलेल्या दागिन्याची किंमत २ लाख ८० हजार रुपयांच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
advertisement
चोरट्यांसाठी उल्कानगरी ठरतेय 'सेफ झोन'
या घटनेनंतर परिसरातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. खरं तर, ओंकारेश्वर मंदिर परिसरातून चोरट्यांना बीड बायपासच्या दिशेने पळून जाणे अत्यंत सोयीचं पडतं. तसेच जय विश्वभारती कॉलनी ते शाहनूर मियाँ दर्गा या भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून त्यावर गतीरोधक नाहीत. यामुळे दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने पळून जाण्यात यशस्वी होतात. या भागात महिन्यातून ३ ते ४ चोरीच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे.
advertisement
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागातील दुकानांबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. हवालदार वानखेडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 11:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
जेवणानंतर सासूसोबत शतपावली करणं पडलं 3 लाखांना, संभाजीनगरमध्ये तरुणीसोबत विचित्र प्रकार









