वंशाला दिवाच हवा, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, लेकरं आईविना पोरकी!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: मागील अडीच वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून भक्तीला विविध कारणांवरून त्रास दिला जात होता.
बीड: सध्याच्या काळात देखील काही ठिकाणी वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टहास असल्याचे दिसते. बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलासाठी सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. तीन मुली झाल्याने पतीला दुसरे लग्न करण्याची संमती द्यावी, यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. त्यामुळे तिने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. भक्ती अमोल कोरडे असे मृत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी पतीसह सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील अडीच वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून भक्तीला विविध कारणांवरून त्रास दिला जात होता. घरात तीन मुली झाल्याने तिच्यावर सतत टीका केली जात होती. तसेच पतीला दुसरे लग्न करता यावे यासाठी तिने संमती द्यावी, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासोबतच वारंवार मारहाण करून बाँड पेपरवर लिहून देण्याची सक्तीही करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
advertisement
या सततच्या छळामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या भक्तीने 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास राहत्या घरी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
advertisement
काही दिवस उपचार सुरू असल्यानंतर तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला पुन्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती सुधारू शकली नाही आणि अखेर 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृत विवाहितेची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अमोल अर्जुन कोरडे, सासरे अर्जुन साधू कोरडे आणि सासू आशाबाई अर्जुन कोरडे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
वंशाला दिवाच हवा, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, लेकरं आईविना पोरकी!









