MSRTC Vacancy :एसटी महामंडळात १७ हजार ७४२ पदांची मेगाभरती, कोणाला मिळणार पहिलं प्राधान्य? परिवहन मंत्र्यांची घोषणा
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
ST Bus Recruitment : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या 'लाल परी'ला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) मेगा भरती होणार आहे
मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या 'लाल परी'ला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) मेगा भरती होणार आहे. एसटी महामंडळात तब्बल १७ हजार ७४२ कर्मचाऱ्यांची महाभरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वित्त विभागाच्या मंजुरीनंतर प्रक्रिया सुरू
आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधीमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. महामंडळात चालक आणि वाहकांची मोठी कमतरता असल्याने हा भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. "सदर भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, तिथून हिरवा कंदील मिळताच भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाईल," असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
advertisement
५ हजार नवीन बस खरेदीचा संकल्प
एसटी महामंडळ सध्या तोट्यात असली तरी ती नफ्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महामंडळ दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करणार आहे. त्यापैकी ३ हजार वाहनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, टाटा मोटर्सला २१०० बस पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाड्यांची संख्या वाढत असल्याने कर्मचारीही तेवढ्याच प्रमाणात आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.
advertisement
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
२०२२ मधील संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी २,१२५ चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. आता होणाऱ्या कायमस्वरूपी महाभरतीमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 11:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MSRTC Vacancy :एसटी महामंडळात १७ हजार ७४२ पदांची मेगाभरती, कोणाला मिळणार पहिलं प्राधान्य? परिवहन मंत्र्यांची घोषणा









