सलग दोन दिवस मविआच्या नेत्यांनी निवडणूक यादीतील अनेक त्रुटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच या यादीत बोगस मतदारांचा शिरकाव झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या सगळ्या घडामोडीनंतर आता मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आरोप केलेल्या ठिकाणी चौकशी करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
advertisement
महाविकास आघाडीतील नेत्यांनी ज्या ठिकाणच्या मतदार याद्यांबाबत शंका व्यक्त केली आहे. अशा सर्व ठिकाणची जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याची प्रत आरोप करणाऱ्या नेत्यांना दिली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चाकूरमध्ये एकाच घरात २०० मतदारांची नोंद केल्याचं देखील निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याबाबतची अधिक माहिती आता समोर आली आहे. चाकूरमध्ये एकाच घरात २०० मतदार राहत असल्याच्या आरोपांची चौकशी केली असता हे मतदार झोपडपट्टीतील असल्याचं समोर आलं आहे. या झोपडपट्टीतील घरांवर घर क्रमांक लिहिला नसल्याने सगळ्यांच्या मतदान कार्डवर एकाच घराचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं आहे.