मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील २.५ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे शासन काटेकोर पालन करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
advertisement
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन आंदोलकांकडून झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच आंदोलकांकडून रस्त्यावर ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यासंदर्भात देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. गोष्टी सामंजस्याने झाल्या पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असतो परंतु न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर शासन आणि प्रशासनाला ज्या प्रकारची कारवाई करायची असते ती कारवाई करेल, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आंदोलकांच्या वागण्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज
मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विचारले असता फडणवीस म्हणाले, मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे म्हणता येणार नाही. काही आंदोलकांनी रस्ते बंद केले होते. परंतु अर्ध्या तासात पोलिसांनी रस्ते रिकामे केले. काही ठिकाणी घटना घडल्या, त्या नक्कीच भूषणावह नाही. आंदोलकांकडून नक्कीच अशी अपेक्षा नाही. परंतु अशा वागण्याचेही समर्थन होणार असेल तर राज्य कुठे चाललंय, याचा विचार व्हायला हवा. आपण सगळे छत्रपतींचे नाव सांगणारे लोक आहोत. अशा वागण्याने आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करतोय का याचा विचार आंदोलकांनी करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री, मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा का करीत नाहीत?
उपोषण सुरू होऊन चार दिवस झाले तरी राज्य सरकारमधील कुणीही मंत्री किंवा मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा का करीत नाहीत? असे विचारले असता, चर्चेला कुणी सामोरे आले तर चर्चा होईल. माईकवर चर्चा होते का? असे विचारीत सरकार अजिबात इगो धरत नाही, असे फडणवीस म्हणाले.